दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू
दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू

दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू

sakal_logo
By

58164
सावंतवाडी ः दिवाळी साहित्य खरेदीसाठी येथील बाजारपेठेत झालेली गर्दी.
----------------------------

दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू
---
गर्दी वाढली; पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः दिवाळी सणानिमित्त येथील बाजारपेठेत आजपासून खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने सर्वजण आवश्यकतेनुसार खरेदी करताना दिसत आहेत. येत्या लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज आदी कार्यक्रमांमुळे घराघरांत आनंदाचे वातावरण आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी मात्र नाराज आहेत.
यंदा महागाईने डोके वर काढल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर झाल्याचे दिसते. लक्ष्मीपूजनाची तयारी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुकानदार आपल्या दुकानांची साफसफाई करण्यात मग्न दिसत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी व दुकानाला पुष्पहार लावण्यासाठी आवश्यक झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आली आहेत. यंदा दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शंभर रुपये किलोच्या भावाने ती विकली जात आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी सावंतवाडीकरांनी आज बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी आणि ढगाळ वातावरणानंतर वरुणराजाने सायंकाळी विश्रांती घेतली आणि सावंतवाडीकर खरेदीसाठी बाहेर पडले. काल (ता. २१) रात्रभर शहरात पाऊस झाला. दिवाळी पावसात जाते की काय, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये होती. मात्र, वरुणराजाने दुपारनंतर विश्रांती घेतली आणि शहरवासीय खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे दिवाळी साध्या पद्धतीने साजरी झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. मेन रोड, गांधी चौक परिसरात कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वस्तू खरेदीसाठी; तर जयप्रकाश चौकात घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. याच गर्दीतून दुचाकी, तीनचाकी वाहने मार्गक्रमण करीत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
---
शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच
दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची दिवाळी मात्र यावर्षी शेतातच जाणार आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने भात कापणी खोळंबली. त्यामुळे शेतकरी भातकापणीच्या मागे असून, दिवाळी सण शेतातच जाईल.