रिया आळवेकरांना ‘सिंधुदुर्गभूषण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिया आळवेकरांना ‘सिंधुदुर्गभूषण’
रिया आळवेकरांना ‘सिंधुदुर्गभूषण’

रिया आळवेकरांना ‘सिंधुदुर्गभूषण’

sakal_logo
By

रिया आळवेकरांना ‘सिंधुदुर्गभूषण’
सिंधुदुर्गनगरी ः देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर यांना ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचा ‘सिंधुदुर्गभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे बुधवारी (ता. २६) वितरण होणार आहे. वारंगाची तुळसुली (ता. कुडाळ) येथील रिया आळवेकर सध्या ओरोस प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नाही, तर देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका आहेत. जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी यापूर्वी अनेक पुरस्कार मिळविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनने ‘सिंधुदुर्गभूषण’ हा विशेष राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. २६ ला सायंकाळी चारला पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे.
-------------
शेतकऱ्यांना भरपाईची मागणी
दोडामार्ग ः सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती व फळबागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय गवस, शिवराम मोर्लेकर, देवानंद गवस, मदन राणे, भिवा गवस यांनी दिला. तहसीलदारांना तसे निवेदन देण्यात आले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती व फळबागायती केली जाते. लांबलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला गेला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
--------------
आपत्कालीन प्रशिक्षण शिबिर
कुडाळ ः कोणत्याही आपत्तीप्रसंगी घरात वा बाहेर अचानकपणे उद्‌भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संकटावर मात करत स्वत:सह दुसऱ्याचा बचाव कसा करावा, याची माहिती लहान वयातच विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने कसाल येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते १२ या कालावधीत जिल्हास्तरीय मोफत आपत्कालीन प्रशिक्षण शिबिराचे व्यवस्थापन आयोजन केले आहे. युरेका सायन्स सेंटर व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट कसालच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे राजेंद्र लोखंडे मार्गदर्शन करणार आहेत. दक्षता विभाग, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज कुरुंभटी विविध विषयांवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.