Ratnagiri पावसाच्या भीतीने दिवाळी होतेय शेतावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri
पावसाच्या भितीने बळीराजाची दिवाळी शेतावरी

Ratnagiri : पावसाच्या भीतीने दिवाळी होतेय शेतावर

रत्नागिरी : दरवर्षी गणेशोत्सवानंतर बळीराजाला शेत कापणीचे वेध लागतात. यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा साजरा झाला, आता दिवाळी सुरू झाली पण पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. सर्व भातशेती कापणीस तयार झाली आहे. त्यावर परतीचा पाउस पाणी फेरत आहे. सकाळी कापणी सुरू करावी तर दुपारी पाऊस पडतो. हातातोंडाशी आलेला पिकाचा घास परतीचा पाऊस हिरावून नेत आहे. या परतीच्या पावसाने बळीराजाची दिवाळी शेतावरच जाण्याची चिन्हे आहेत.

यंदा अजूनही माॅन्सून माघारी फिरण्याची चिन्हे नाहीत. दर दिवशी जिल्ह्यात कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे. दिवाळी सुरू झाली तरी परतीचा पाऊस थांबलेला नाही. रखरखीत उन्हाचा तडाखा आणि पाठोपाठ विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस यामुळे कापणीसाठी तयार भात शेतीवर पाणी फेरत आहे. हळवी आणि महान अशी सारी भातपिके एकदम कापणीस तयार आहेत.

मात्र पावसामुळे उभी पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. मळ्यात, खाचरात पाणी साचून आडव्या पिकांच्या लोंबीवरच नव्याने कोंब येण्याची भीती शेतकऱ्याला सतावत आहे. पावसात भात पडून राहिल्यामुळे दाण्यांचीही गळ सुरू झाली आहे. काही ठिकाणी जास्त काळ तयार भात पावसात राहिल्यामुळे तांदूळ काळे पडण्याची भीती शेतकरी वर्गाला आहे. सर्वाधिक फटका संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. परंतु कृषी विभागाकडून नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

राजापूरमधील दोन, लांजा तालुक्यातील एक अशा तीन महसुली मंडळात अति पावसामुळे भात शेतीला फटका बसला आहे. जिल्हाभरात शेतीची वाताहात उडण्याची स्थिती आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचे सावट लक्षात घेउन भातकापणीकडे बळीराजाने लक्ष केंद्रित केले आहे. बळीराजाची दिवाळी शेतातील कापणीच्या चिंतेत जात आहे. गेले पंधरा दिवस थोडाथोडा पाऊस पडत असल्यामुळे दिवाळीत शेतकरी शेतातच आहे.

पावसाच्या भीतीने सकाळच्या सत्रात कापणी आटोपून दूपारी भात सुकवले जाते. संध्याकाळी गोळा केलेले भात उडवीत भरून ठेवले जात आहे. या वर्षी खरिपाच्या हंगामासमोर परतीच्या पावसाचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वातावरणाचा अंदाज घेत उघडीप पाहून पिकांची कापणी करावी. कापणी केलेले पीक सुरक्षित झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. यामुळे संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरीप स्थिती

  • खरिपाची ७७ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड.

  • ६६ हजार ८७५ हेक्टरवर भात लागवड.

  • नागली पिकाची ९ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड.

  • कडधान्य ३७२ हेक्टर तर इतर पिक लागवड ३७ हेक्टर क्षेत्रावर.

  • सध्या पावसामुळे भातपिकांच्या कापणीची कामे रेंगाळली.

  • आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के कापणी पूर्ण.

दिवाळी आली तरी पाऊस न थांबल्याने भातशेती कापणार कधी याची चिंता आहे. पिकलेलं खायला मिळणार की नाही, हा प्रश्न उभा राहिलाय. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची शासनानेही दखल घेऊन योग्य नुकसान भरपाई द्यावी.

- संतोष आंबेकर, शेतकरी-फणसवळे, रत्नागिरी

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून कळवण्यात आलेले नाही. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ कंपनीकडून पंचनामे करून घ्यावेत.

- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी