Chiplun चिपळूणात दिवाळीच्या खरेदीचा उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun
चिपळूण - चिपळूणात दिवाळीच्या खरेदीचा उत्साह

Chiplun : चिपळूणात दिवाळीच्या खरेदीचा उत्साह

चिपळूण : रविवार दिवाळी खरेदीचा दिवस होता. यामुळे रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. यानुसार यंदा शनिवार धनत्रयोदशी आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शनिवार आणि रविवारी दिवाळी खरेदीसाठीचा आनंद लुटला.

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीला लागले असल्याचे चित्र दोन दिवस शहरात दिसत आहे. परतीचा पाऊस काही दिवस धुमाकूळ घालत आहे. सांयकाळी लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्याचवेळी पाऊस पडत असतो.

मात्र शनिवारपासून पाऊसही गायब झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मुक्तपणे खरेदी करता येत होती. आज दिवसभर चिपळूण शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. संपूर्ण परिवार खरेदीसाठी सकाळपासूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून पाय ठेवायलाही जागा नाही. सर्वाधिक गर्दी दिसती ते कापड दुकानांमध्ये.

लहान मुलांसह महिला कपडे खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र प्रत्येक दुकानात दिसत आहे. आकाश कंदील, तयार फराळ, पणत्या, रांगोळीचे साहित्य आणि गृह सजावटीच्या वस्तू घेण्यात नागरिक व्यस्त होते. मिठाईच्या दुकानांमध्येही या वर्षी गर्दी होती. भेट देण्यासाठी तयार पॉकिंग मिठाईच्या दुकानाबाहेर मांडण्यात आले होते. मोबाईल विक्रीची दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती.

२० ते ३० टक्क्यांनी महाग

शहरातील सर्वच दुकानांमध्ये वस्तूंचे वाढलेले दर पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याचीही वेळ आली आहे. गतवर्षीपेक्षा सर्वच वस्तू २० ते ३० टक्क्यांनी महागल्याचे दिसत आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे आणि त्यातही कोरोना संकट नसल्याने खरेदी जोरात सुरू आहे.

दोन वर्ष ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांच्या चेहऱ्यावरही या दिवाळीने नवचैतन्य आणले आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकही चिपळूण शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे समाधान आहे.

- विलास जाधव, व्यापारी चिपळूण