पान एक-... पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-... पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही
पान एक-... पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही

पान एक-... पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही

sakal_logo
By

58314

... पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही

दीपक केसरकरांची मिश्कील टीका; विरोधकांकडून राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः राज्यात जनतेसाठी काम करताना विरोधकांकडून डिवचण्याचा, राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र याला दाद देणार नाही. एकाच वेळी असे उत्तर देऊ की, पुन्हा डिवचण्याची हिंमत होणार नाही, असा हल्लाबोल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विरोधकांवर केला. ‘आनंदाचा शिधा’ देऊन सरकारने गरिबांची दिवाळी गोड केली आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सरकार करत असून हे वेगवेगळ्या निर्णयांतून दिसते; मात्र केवळ सत्ता असून चालत नाही, तर हे करण्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी राज्यातील विरोधकांवर मिश्कील टीका केली. केसरकर म्हणाले, ‘‘आज आमच्याकडे सत्ता आहे; परंतु सत्ता नाही म्हणून कोणाला हिणवणे योग्य नाही. सत्ता असताना लोकांपर्यंत गेले पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. हे काम शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे आणि म्हणूनच आम्ही आज त्यांच्यासोबत आहोत. आमचे सरकार बाळासाहेबांच्या विचारांवर चालले आहे. येणाऱ्या काळातही सर्वसामान्य जनतेसाठी सरकार काम करेल. जे निर्णय मागील सरकारच्या काळात रखडले होते, ते आता पटापट होत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली, त्यांना एका क्लिकवर खात्यात प्रोत्साहनपर निधी जमा झाले आहे. शेतीचे पंचनामे झटपट होत आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यानुसार आमच्या सरकारने शेतीपंपांचे वीज बिल निम्म्यावर आणण्याचे काम केले. केवळ मतांसाठी राजकारण करणे हा वेगळा भाग आहे आणि जनतेच्या हितासाठी राजकारण करणे हा वेगळा भाग आहे. विरोधकांनी पक्षाला सहानुभूती मिळण्यासाठी हा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला असता, तर ही वेळ आली नसती.’’
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, ‘‘शिक्षण खात्यात येत्या काळात आमूलाग्र बदल होणार असून हुशार मुलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील मुलांच्या विकासासाठी अधिक भर देणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाच्या बाबतीत आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची निवड केली आहे. त्यामुळे जगातील सर्व प्रयोग या जिल्ह्यात केले जातील. शिवाय महाराष्ट्र औद्योगिक कृषी क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मुंबईचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवीन शिक्षण धोरण अंमलात आणण्यासाठी, आरोग्यदायी राज्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’
---
सगळेच आमदार भाजपच्या संपर्कात
शिंदे गटाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत मंत्री केसरकर यांना विचारला असता, आमचे सगळेच आमदार भाजपच्या संपर्कात असतात. आम्ही एकत्र असून आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे कोण काय लिहितो किंवा बोलतो, याला महत्त्व नाही, असे केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे पूर्वी पक्षासाठी बाहेर पडत होते, आज जनतेसाठी बाहेर पडले याचा आनंद आहे, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.