Sindhudurg विद्यार्थ्यांनी फुलवला ‘श्रमाचा भोपळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg
विद्यार्थ्यांनी फुलवला ‘श्रमाचा भोपळा’

Sindhudurg : विद्यार्थ्यांनी फुलवला ‘श्रमाचा भोपळा’

सिंधुदुर्गनगरी : ओरोस हायस्कूलच्या ‘श्रमाचा भोपळा’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भोपळा पिकाचे मोठे उत्पन्न घेतले. कसाल शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ओरोस-सिंधुदुर्गनगरी ही प्रशाला जिल्ह्यातील उपक्रमशील म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यास, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांत मुले आघाडीवर असतात. संस्थेने अलीकडेच स्वमालकीची प्रशस्त वास्तू उभी केली आहे.

भरपूर जागा आणि पाणी उपलब्ध असल्याने शाळेने आता विद्यार्थ्यांसाठी शेती प्रकल्प सुरू केलेला आहे. शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यात विशेष लक्ष देत आहेत.

भगीरथ प्रतिष्ठानच्या सहकार्याने यावर्षी अनेक प्रकारची रोपे लावली आहेत. सोबत भात, हळद, आले, कणगी, सुरण, भोपळा वगैरेंची लागवड केली आहे. शाळेने यावर्षी काही क्षेत्रांवर भोपळा लागवड केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने जवळपास १०० नगाचे चांगले उत्पन्न यंदा मिळाले. बी रुजविण्यापासून ते तयार पीक काढण्यापर्यंतचे सर्व प्रत्यक्ष शिक्षण याद्वारे विद्यार्थ्यांना मिळाले. त्यात सेंद्रिय खत, कीटकनाशकांचा वापर, पाणी नियोजन याही बाबी त्यांना समजल्या.

यातून मिळालेल्या भोपळ्यांचा विद्यार्थ्यांनी काल ओरोस बाजारात विक्री स्टॉल लावला होता. अवघ्या अडीच-तीन तासांत सगळा माल चांगल्या दराने खपवून त्यांनी विक्री कौशल्यही सिद्ध केले. दरम्यान, संस्थाध्यक्ष भाई सावंत, सचिव यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच अनेक मान्यवरांनी या विक्री केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

छोट्या प्रयोगांतच मोठी ताकद

वास्तविक, हे सारे शिक्षण हे आपण आणि आपली शिक्षण पद्धती विसरली आहे. यातून माणूस खरा अंतर्मुख होतो. वह्या-पुस्तकांसोबत शेती ही खरी शिक्षण पद्धती आहे. त्यातून विद्यार्थी मातीशी जोडला जातो. आगामी काळात सर्व शाळा असे प्रयोग पुन्हा सुरू करतील तेव्हा जादू होईल. कारण छोट्या-छोट्या प्रयोगांतच मोठी ताकद असते, असे मत काहींनी व्यक्त केले.