फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा
फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा

फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा

sakal_logo
By

rat24p10.jpg
L58422
डॉ. अनिल सावरकर

(वेध वैद्यक विश्वाचा.............लोगो)

इंट्रो
श्‍वासोच्छवासाचा होणारा त्रास म्हणजे दमा, अशी साधारणपणे दम्याची व्याख्या करता येईल. या दम्याचे साधारणपणे दोन मुख्य प्रकार आहेत.
एक फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा आणि दुसरा हृदयविकारामुळे लागणारा दमा.वरील दोन्ही प्रकारांत जरी रूग्णाची तक्रार श्‍वासोच्छवासास होणारा त्रास अशीच असली तरी दोन्ही प्रकारच्या दम्याची कारणे व उपचार हे पूर्ण वेगळे आहेत व एका प्रकारात दिली जाणारी औषधे दुसऱ्या प्रकारात हानिकारक असू शकतात, अशी आहेत. त्यामुळे कोणालाही दमा लागल्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडून त्याचे निदान होणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यावर उपचार करणे शक्य आहे. अंदाजे औषधे घेतल्यास कधी कधी उपायापेक्षा अपाय होऊ शकतो. आजच्या लेखात फुप्फुस विकारांमुळे लागणाऱ्या दम्याबाबत माहिती घेऊ.
- डॉ. अनिल सावरकर, संगमेश्वर
..........................
फुप्फुस विकारांमुळे लागणारा दमा

फुप्फुस विकारांमुळे लागणाऱ्या दम्यात श्‍वसननलिका व तिच्यापुढे शाखा-उपशाखांना आतून सूज येते. याचे मुख्य कारण असते त्या व्यक्तीला कोणत्याही ठराविक पदार्थांची असलेली, यात श्‍वासनलिका व तिच्या शाखा-उपशाखा आतून सुजल्यामुळे आतून बारीक होतात, आकुंचन पावतात आणि कमी प्रमाणात हवा आपल्या फुप्फुसापर्यंत पोचते. त्यामुळे रक्तात शोषला जाणारा प्राणवायू कमी होतो व शरीराला पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे मेंदू आणखी प्राणवायूची मागणी करतो व याचा परिणाम म्हणून श्‍वास घेण्याचा वेग वाढतो. त्यात भर म्हणजे या सुजलेल्या भागात आतून काही स्त्राव स्रवतात याला आपण बेडका म्हणतो. हे स्राव श्‍वासोच्छवासात आणखी अडथळा निर्माण करतात व त्यामुळे दमा लागलेल्या माणसाच्या छातीतून श्‍वास घेताना विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. खोकला, छाती आवळून येणे आणि विशेषत: रात्री आणि सकाळी लवकर श्‍वास घेण्यात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून येतात.
दम्याची कारणे शरीराच्या बाहेरील आणि शरीराच्या आतील अशा दोन प्रकारची असतात. शरीराच्या बाहेरील कारणांमध्ये प्राण्यांची त्वचा, केस किंवा पंख, धूळ, धूळीतील विषाणू, झुरळे, वनस्पती आणि गवतांचे परागकण, बुरशी (घरातील आणि बाहेरील), सिगारेटचा धूर, हवेचे प्रदूषण,
थंड हवा किंवा हवामानातील बदल, रंगकाम किंवा स्वयंपाकामुळे निघणारे तीव्र वास, सुगंधी उत्पादने, तीव्र स्वरूपाचे भावनिक उद्वेग, दुःख, अति आनंद, अॅस्पिरिन किंवा बिटाब्लॉकर्ससारखी औषधे, अन्नातील सल्फाईटस/मद्य किंवा शीतपेये/सुकामेवा, कामाच्या ठिकाणी आपल्याला होणारा त्रास किंवा अॅलर्जीकारकांचा प्रादुर्भाव, जसे विशेष रसायनं किंवा धूळ यांचा समावेश होतो.
शरीराच्या आतील कारणांत गॅस्ट्रो इसोफॅजिल रिफ्ल्क्स नावाची स्थिती यामध्ये छातीत जळजळ होते आणि विशेषत: रात्रीच्यावेळी दम्याची लक्षणे अतितीव्र होतात. यावर उपचार घेतल्यास यामुळे लागणारा दमा थांबतो. कौटुंबिक इतिहास, गुणसूत्रामुळे तसेच लठ्ठपणा तसंच अन्य आरोग्यसमस्या यांचाही दम्याशी संबंध असू शकतो.
दम्याच्या लक्षणांत खोकला बहुतांशी कोरडाच असतो; पण कफ/बेडका म्हणजे ओला खोकलासुद्धा दम्याचं लक्षण आहेच. दम लागणे किंवा धाप लागणे, श्‍वासाचा आवाज शिट्टीसारखा सू-सू येतो. बरेचदा झोपेत असा आवाज येतो. त्यामुळे पेशंटचे नातेवाईक या लक्षणाबद्दल जास्त सांगतात. छातीतून घरघर आवाज (जणू काही कफ अडकलेला असावा असा.) श्‍वासनलिका आकसलेल्या असल्याने त्यातून बाहेर पडणार्‍या हवेचा येतो.छातीवर येणारा दबाव किंवा आवळल्यासारखं वाटणं हे एक कॉमन लक्षण. बरेचदा रुग्ण काहीतरी वजनदार वस्तू छातीवर ठेवल्यागत भार जाणवतो म्हणून सांगतात. दमा असणाऱ्या ६०- ७० टक्के रुग्णांमध्ये सर्दीचा त्रास जाणवत असतो. पोटातले येणे आदी लक्षणे तान्ह्या मुलांमध्ये आढळतात.
लहान मुलांमध्ये श्‍वसनाचे स्नायू पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे पोटाचे स्नायू श्‍वास घेण्यासाठी मदत करतात आणि ती आत-बाहेर होणारी हालचाल (हापसल्यासारखं) पोटातलं आलं असं म्हटल जातं.या शिवाय दूध पिता न येणं, श्‍वासाचा आवाज येणं, छातीवर हात ठेवला तरी घरघर जाणवते. बाळाचं वजन योग्यरितीने वाढत नाही अशी साधीच पण महत्वाची लक्षणे दमा निदान करण्यास उपयुक्त ठरतात. तज्ञ डॉक्टर रूग्णाला तपासून व त्याच्या काही तपासण्या करून योग्य निदान करतात. केव्हाही स्वत:च निदान करून स्वत:च औषधे घेऊ नयेत.