Kokan रायगडावर रंगला ‘शिवचैतन्य सोहळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
रायगडावर रंगला ‘शिवचैतन्य सोहळा’

Kokan : रायगडावर रंगला ‘शिवचैतन्य सोहळा’

कुडाळ : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्यावतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर श्री शिवचैतन्य सोहळा मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी जाऊन तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले. पाचाड येथील राजवाडा, गडावरील चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, महादरवाजा या ठिकाणी विधिवत पूजन तसेच दिवे लावून रांगोळी काढण्यात आली. श्री शिरकाई देवी, देवी भवानी कडा यांची पूजा करून ओटी भरण्यात आली.

व्याडेश्वर आणि श्री जगदीश्वर मंदिरात पूजा-आरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण जगदीश्वर प्रासाद दिव्यांच्या उजेडात उजळून निघाला होता. दीपावलीचे औचित्य साधून समितीतर्फे गडावरील रहिवासी आणि पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांनी मशालींच्या उजेडात श्री शिरकाई मंदिर ते राजसदर अशी छत्रपती शिवरायांची वाजतगाजत पालखी काढली. नंतर राजदरबारात छत्रपती शिवरायांना मशालींनी मानवंदना देऊन विधिवत पूजा आरती केली.

गडावरील अनावश्यक नियमामुळे हा सोहळा साजरा करताना समितीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा सोहळा साजरा करण्यासाठी समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी केले. नंतर त्यांनी उपस्थित सर्व शिवभक्तांचे आभार मानले आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी आम्ही मावळे (बोरिवली), आपला कट्टा (ऐरोली) आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान (विक्रोळी) या संस्थांचे सहकार्य लाभले.

स्नेहसोहळा आनंददायी!

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडतर्फे २०१२ सालापासून किल्ले रायगडावर श्री शिवचैतन्य सोहळा साजरा करण्यात येत आहे. दीपोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला जितकी वर्षे पूर्ण झाली, तितक्या संख्येत मशाली लावून महाराजांना मानवंदना देण्यात आली. राजसदर, श्री जगदीश्वर प्रासाद आणि श्री शिरकाई माता मंदिर, व्याडेश्वर मंदिर, गंगासागर येथे राजाभिषेक शकानुसार पणत्या लावण्यात आल्या. रायगडच्या पवित्र वातावरणात मशालींच्या उजेडात साजरा होणारा स्नेहसोहळा मनाला समाधान आणि आनंद देऊन जातो, असे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले