साहित्य सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य सदर
साहित्य सदर

साहित्य सदर

sakal_logo
By

58453
वृंदा कांबळी

दिवाळी अंकांची जादू

लीड
‘‘लक्ष दिव्यांची दिवाळी,
सण सुंदर वर्षाचा,
घरी-दारी, अंगणात
व्हावा वर्षाव सुखाचा’’
अशी ही दिवाळी येते. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. घरातून दिवाळीचा फराळ डब्यातून असतो. फराळाची गोड, तिखट चव जिभेवर रेंगाळत असते. फराळाचा खमंग वास, अत्तराचा सुगंध असे संमिश्र वास घरभर दरवळत असतात. डब्यातला फराळ रसनेची तृप्ती करीत असतो. आपण तृप्तीचा ढेकर देतो. तसेच दिवाळीचा साहित्य फराळ भरलेले आकर्षक दिवाळी अंक विविध चवीचा, विविध रुचीचा आवडीप्रमाणे घ्याल तो साहित्याचा फराळ पुरवत असतात. कलात्मक आणि वैचारिक बौद्धिक भूक हे अंक शमवतात.
- सौ. वृंदा कांबळी
...............
"शब्दकळ्यांनी व्हावे गंधित,
कविता मनी स्फुरावी,
दीप उजळता अवघ्या सदनी
प्रकाशगाणी गावी"
अशी मनाची स्थिती दिवाळीत करावी ती या दिवाळी अंकांनीच. आज सोशल मीडियाचा जबरदस्त प्रभाव जनमानसावर आहे. अनेक माध्यमांतून साहित्य प्रकाशित होतच असते. आता ई-बुक्सही मोठ्या प्रमाणात येत आहेत. कवितांचा तर पाऊस पडतो असतो. लेख, कथा ब्लॉगवरील विविध प्रकारचे साहित्य प्रसारित होत असते. नुसते ‘क्लिक’ करताच माहितीचा खजिनाच समोर उघडतो. क्षणभरात पाहिजे त्या विषयावरील अद्ययावत माहिती मिळू शकते. माहिती पोहोचवणारे अनेक स्रोत आज समोर आहेत. हे सगळे खरे आहे. अशा या संक्रमणावस्थेतही दिवाळी अंकांची जादू कमी झालेली नाही. दिवाळी अंकांचे गुळगुळीत आकर्षक मुखपृष्ठ पाहताक्षणीच ते डोळ्यात भरते. तो अंक उघडून बघण्याचा मोह अनावर होतो आणि एकदा का अंक उघडला की, जादूची नगरी समोर ठाकल्याप्रमाणे त्या नगरीत आपण सफर करून येतोच. त्यातील कविता, लेख, कथा यांचा समाचार घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पूर्वीपासूनचे अनेक अंक आज आपला दर्जा आणि सातत्य टिकवून आहेत. नवनवीन दिवाळी अंक प्रत्येक वर्षी निर्माणही होत आहेत. अशा विविध प्रकारच्या अंकांनी साहित्य रसिकांचा मानसिक पिंड पोसलेला आहे. या दिवाळी अंकानी महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केलेले आहे. अनेक दिवाळी अंकानी रसिक घडवलेही आहेत. मौज, धनुर्धारी, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता अशा कितीतरी दर्जेदार अंकांची नावे सांगता येतील. त्यातील साहित्य म्हणजे रसिकांची दिवाळी, साहित्य फराळाची मेजवानीच असते. आज वाचन संस्कृती लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणतात; पण या दिवाळी अंकानी वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत केलेली आहे. दिवाळी अंक वाचण्याचा मोह साहित्यप्रेमींना आणि सर्वांनाच होतो. म्हणूनच तर दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि खपतातही. ते वाचले जातात. दिवाळी अंकातून नव्या-जुन्या लेखक व कवींना संधी मिळते. नवीन लोकांना प्रोत्साहन मिळते. दिवाळीचे प्रकाशवैभव घरादारात असतानाच मनामनात ज्ञानाचा प्रकाश पसरण्याचे कार्य हे अंक करीत असतात. दिवाळी अंकांचे संपादन करताना चोखंदळ वृत्ती ठेवावी लागते. सर्व प्रकारची सावधानता बाळगावी लागते. अंक दर्जेदार व आकर्षक होण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये वापरावी लागतात. त्यामुळे संपादनाच्या क्षेत्रात नव्यानेच पाऊल टाकणाऱ्यांना अनेक गोष्टी शिकवून जातात. दिवाळी अंकाच्या संपादनाच्या अनुभवातून त्यांच्यासाठी खूप ज्ञान व विविध कौशल्ये विकसित होतात. मुखपृष्ठ व आतील चित्रे आकर्षक करताना चित्रकारांच्या कौशल्याला संधी मिळते. विनोदी चुटके असतात. कार्टून्स असतात. दिवाळी अंक हे केवळ लेखक व कवी यांनाच नव्हे, तर संपादक, प्रकाशक, चित्रकार, व्यंगचित्रकार अशा अनेक क्षेत्रांतील कलाकारांना वरदानच असते. त्यामुळे परिस्थितीची कितीही आक्रमणे आली, कितीही बदल झाले, तरी दिवाळी अंकांचे महत्त्व कमी होणार नाही. दिवाळीच्या सुटीत घरबसल्या मनोरंजनाचे आणि ज्ञानार्जनाचे दिवाळी अंकांसारखे दुसरे प्रभावी साधन नाही. माझा साहित्यप्रेमाचा पिंड या दिवाळी अंकांतील साहित्यावरच पोसलेला आहे. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी खेडेगावात वाचनालये नव्हती. आमच्या चुलत काकांची दिवाळी अंकांची एजन्सी होती. मी हायस्कूलच्या जीवनात काकांकडे अंकावर नावे घालण्याची मदत करायला जायची आणि त्यांची परवानगी घेऊन अंक सांभाळून धरून वाचून काढायची. त्याची घरची प्रत असेल तर मी ती वाचायला घ्यायची. ते वाचता वाचता मला साहित्याची आवड निर्माण झाली. नंतर मी खूप वाचन केले. इतकी वर्षे निघून गेली; पण दिवाळी अंकांनी माझ्या मनावर केलेले गारुड अद्याप जराही कमी झालेले नाही.