सिंधुदुर्गात थंडीची चाहुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात थंडीची चाहुल
सिंधुदुर्गात थंडीची चाहुल

सिंधुदुर्गात थंडीची चाहुल

sakal_logo
By

सिंधुदुर्गात थंडीची चाहूल
वातावरणात बदल; परतीच्या पावसाला निरोप?
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः जिल्ह्यात आता थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मध्यंतरी परतीच्या पावसाने जोर धरल्यानंतर रविवारी रात्रीपासून (ता. २३) वातावरण बदलू लागले आहे. आज पहाटे अनेकांनी थंडीचा आनंद घेतला. दुपारपर्यंत वातावरणात थंडावा जाणवत होता. वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जोराच्या थंडीची लक्षणे मानली जात होती. असे वातावरण आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह असल्याचे चित्र आहे.
मध्यंतरी परतीच्या पावसाने किनारपट्टी भागासह जिल्ह्याच्या विविध भागाला चांगलेच झोडपून काढले. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करीत अनेकवेळा बरसलेल्या पावसाने शेतकऱ्‍यांसह सामान्य नागरिकांची चांगलीच झोप उडवली. विजांच्या लखलखाटामुळे काहींच्या विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सतत पावसामुळे भात कापणीमध्ये व्यत्यय आला. भातशेतीच्या संभाव्य नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी तालुका प्रशासनासह कृषी विभागाला निवेदने देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली आहे. मध्यंतरी वातावरणातील उष्णतेत वाढ झाली होती. त्यामुळे परतीचा पाऊस बरसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत होते. पर्यायाने ऐन दीपावलीत परतीचा पाऊस पडण्याची लक्षणे मानली जात असतानाच आता किनारपट्टीवरील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. आज पहाटे हवेत गारवा जाणवत होता. दुपारपर्यंत वातावरणात थंडावा होता. त्यामुळे परतीच्या पावसाने निरोप घेतल्याचे चित्र होते. वातावरणातील आर्द्रता कमी नोंदवली गेली. त्यामुळे आता थंडीची चाहूल असल्याचे मानले जात होते.
थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आंबा बागायतदारांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. कडाक्याची थंडी आंबा कलमे मोहोरण्यास अनुकूल मानली जाते. जोराची थंडी पडली आणि वेळीच आंबा कलमांना मोहोर आल्यास आगामी आंबा हंगाम नियोजित वेळेत सुरू होऊ शकतो. आज पहाटे सर्वत्र दाट धुके पसरले होते. हवेतही गारवा जाणवत होता. वाऱ्या‍ची दिशा बदलली असून, येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याचे संकेत असल्याचे मानले जात होते. यामुळे फवारणीच्या पार्श्‍वभूमीवर आता कीटकनाशके तसेच संजीवके विक्रेत्यांचे नियोजन सुरू झाले आहे. विक्रेत्यांनी थंडीच्या अनुषंगाने आंबा कलमे मोहोरण्याच्या शक्यतेने हालचाली सुरू केल्या आहेत. आंबा कलमे मोहोरण्यास अनुकूल वातावरण तयार होत असल्याने आंबा बागायतदारांच्या दृष्टीने समाधानकारक बाब असल्याचे मानले जात आहे.

आंबा हंगामासाठी सुखद चाहूल
कडाक्याची थंडी आंबा कलमे मोहोरण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आजपासून किनारपट्टी भागातील बदलते वातावरण पुढेही असेच कायम राहिल्यास आंबा कलमे मोहोरण्यास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास झाडांना मोहोर येऊन हंगामाच्या दृष्टीने सुखावह बाब ठरू शकते.