मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मासळीवहून कंटेनर उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मासळीवहून कंटेनर उलटला
मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मासळीवहून कंटेनर उलटला

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मासळीवहून कंटेनर उलटला

sakal_logo
By

rat24p36.jpg
58505
खेडः अपघातग्रस्त मासळीवाहू कंटेनर.

भोस्ते घाटात मासळीवाहू कंटेनर उलटला
चालक जखमी; मासे खवय्यांची दिवाळीत चंगळ
खेड, ता. २४ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक निकामी झाल्याने ताजी मासळी वाहून नेणाऱ्या कंटेनरला रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात पलटी झाला. कंटेनरच्या केबिनमध्ये पाय अडकून फसलेल्या चालकाला पोलिस आणि नागरिकांनी महत्प्रयासाने बाहेर काढले. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर मासळीचे क्रेट शेतात अस्ताव्यस्त पडल्याने अपघातस्थळी माशांचा खच पडलेला होता.
गुजरात राज्यातील वेरावळ ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर ताजी मासळी (बांगड्याचे क्रेट) घेऊन गोव्याकडून मुंबईकडे चाललेला होता. महामार्गावरील भोस्ते घाट उतरत असताना कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. चालकाने कंटेनर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो कंटेनर भोस्ते घाटातील स्वरूप ढाब्याजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात पलटी झाला.
अपघात झाला तेव्हा झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. केबिनमध्ये पाय अडकलेला चालक मदतीसाठी याचना करत होता. वेदना असह्य झाल्याने त्याची तडफड सुरू होती; मात्र क्रेनशिवाय त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. अपघात झाला तेव्हा काळोख असल्याने मदतकार्यात अनेक अडचणी येत होत्या. घटनास्थळी पोहचलेल्या युवकांनी कंटेनरची केबिन उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला.
खेड पोलिसांना अपघाताची खबर मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात केबिनमध्ये अडकून पडलेला चालक मदतीसाठी टाहो फोडत होता; मात्र क्रेनशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ क्रेनला पाचारण केले. घटनास्थळी क्रेन पोहचताच क्रेनच्या मदतीने कंटेनरची केबिन वर उचलून अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघातानंतर मासळीचे क्रेट शेतात फेकले गेल्याने शेतात बांगड्यांचा खच पडला होता.

..
चौकट
अपघातांची वाढती संख्या
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका भरधाव वेगातील कंटेनरने महामंडळाची एसटी बस, दुचाकी आणि युटिलिटी जीपला धडक देऊन अवघड वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने भोस्ते घाटातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
..
चौकट :
रात्रीचे जेवण लज्जतदार
घटनास्थळी पोहचलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मासे वेचून रविवारचे रात्रीचे जेवण लज्जतदार बनवले. आज सकाळीदेखील अनेकजण शेतात विखुरलेले मासे वेचताना दिसत होते.