जिल्ह्यात लवकरच गोकुळचे कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात लवकरच गोकुळचे कार्यालय
जिल्ह्यात लवकरच गोकुळचे कार्यालय

जिल्ह्यात लवकरच गोकुळचे कार्यालय

sakal_logo
By

58510
सिंधुदुर्गनगरी : मागण्यांचे निवेदन गोकुळ दूध संघ अध्यक्ष विश्वासराव पाटील यांना देताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. सोबत आमदार नीतेश राणे, उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य.

जिल्ह्यात लवकरच ‘गोकुळ’चे कार्यालय

मनीष दळवी ः दुग्ध व्यावसायिकांसाठी ‘आनंद’ पॅटर्न राबविणार

ओरोस, ता. १९ ः जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता एक लाख लिटरपर्यंत वाढविण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता गोकुळ दूध संघ सर्वतोपरी सहकार्य करेल. जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच अनुभवी डॉक्टर दिले जातील. चारा निर्मिती व प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. दुग्ध व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिध्द असलेला ‘आनंद’ पॅटर्न राबविला जाईल, अशी हमी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष व संचालक, अधिकारी यांनी आज जिल्हा बँकेला दिल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील दूध उत्पादन पुढील चार वर्षांत एक लाख लिटर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघ यांच्या अध्यक्ष व संचालकांची संयुक्त बैठक नुकतीच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोकुळ दूध संघ अध्यक्ष विश्वासराव पाटील, माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, अजित नरके, विजयसिंह मोरे, नंदकुमार ढेगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस. आर. पाटील, बयाजी शेळके, अंजनीताई रेडकर, योगेश गोडबोले, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, व्हिक्टर डान्टस, विद्याप्रसाद बांदेकर, संदीप सावंत, प्रज्ञा ढवण, प्रकाश मोर्ये, गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
दळवी पुढे म्हणाले, ‘‘२०१३ पासून गोकुळ दूध संघाने जिल्ह्यात दूध संकलन सुरू केले आहे. गेल्या ९ वर्षांत प्रथमच जिल्हा बँक संचालक व गोकुळ दूध संघ संचालकांची एकत्रित बैठक जिल्ह्यात होत आहे. पुढील चार वर्षांत आपल्याला दूध उत्पादन एक लाख लिटर करायचे आहे. त्यासाठी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी ही बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक, जिल्हा बँक अधिकारी आणि संचालकांनी समस्या गोकुळ संचालकांच्या समोर मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी संचालक मंडळाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जिल्ह्याला दहा अनुभवी डॉक्टर देण्याचे मान्य केले आहे. जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय गोकुळ सुरू करणार असून यासाठी जिल्हा बँक जागा देणार आहे. चारा निर्मिती व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास सुद्धा या संचालकांनी मान्यता दिली आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘दूध उत्पादकांना मार्गदर्शनासाठी गोकुळ संघाने कोल्हापूर जिल्ह्यात ‘आनंद’ पॅटर्न राबविला होता. तो राज्यात प्रसिद्ध झाला होता. तो पॅटर्न आपल्या जिल्ह्यात राबविण्यासाठी संचालकांनी होकार दिला आहे. या माध्यमातून दूध उत्पादक, शेतकऱ्यांना दूध व्यवसायाचे व्यवस्थापन, गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी लागणारी प्राथमिक औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भाकड जनावरे शिबिरे घेऊन या जनावरांपासून दूध उत्पादन कसे घ्यायचे, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. दुधाळ जनावरे खरेदी करताना ती सामूहिकरित्या खरेदी करण्याच्या संकल्पनेला मान्यता दिली आहे. ज्या भागात मुबलक पाणी व जमीन आहे, त्या भागात दुधाचे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय यावेळी झाला. गोकुळ राबवित असलेल्या सर्व ३२ योजना या जिल्ह्यात राबविणार असल्याचा निर्णय सुद्धा यावेळी झाला. यासाठी लागणारे कर्ज वितरण करण्यासाठी जिल्हा बँक ‘एक खिडकी’ योजना राबविणार आहे. तसेच स्थानिक जनावरे संगोपन योजना राबवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घेण्याचा निर्णय यावेळी जिल्हा बँक व गोकुळ दूध संघ यांच्या संचालकांनी घेतला आहे.’’
...............
चौकट
कर्जासाठी ५० कोटींची तरतूद
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेला ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा बँक संचालक मंडळाने ३१ मार्च २०२३ पर्यंत ५० कोटी रुपये कर्ज वितरण करण्यासाठी आर्थिक तरतूद केली होती. यापूर्वी जिल्हा बँकेकडून एका आर्थिक वर्षात २० ते २५ लाख रुपयांच्या बाहेर कर्ज वितरण झालेले नाही, असे यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्गात दूध उत्पादन वाढण्यासाठी गोकुळ आणि जिल्हा बँक यांच्यात संवाद आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.