Machoi Peak : जिद्दीच्या अरविंदने केले मचोई शिखर सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Machoi Peak Mountain in Jammu and Kashmir
जिद्दीच्या अरविंदने केले मचोई शिखर सर

Machoi Peak : जिद्दीच्या अरविंदने केले मचोई शिखर सर

रत्नागिरी : जिद्दी माउंटेनिअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी जम्मू काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट आणि ५ हजार ३९३ मीटर उंचीचे मचोई शिखर सर केले. क्लायंबिंग अभ्यासक्रमात त्यांची कामगिरी अव्वल ठरली आहे. नवेले यांनी राजस्थान, माऊंटअबू येथून बेसिक आणि रॉक क्लाइंबिंग कोर्स पूर्ण केला. यापूर्वी जम्मू काश्मीरमधील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग आणि विंटरस्पोर्ट्स येथे बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स पूर्ण केला होता. त्यांची अ‍ॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग अभ्यासक्रमासाठी नियुक्ती झाली. त्यांनी आत्तापर्यंत ५० सह्याद्रीतील सुळके आणि कातळभिंती ओलांडली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील अरविंद यांची सुरवात पहलगाम येथून झाली.

नुकतेच त्यांनी अ‍ॅडव्हान क्लायबिंगच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जम्मू काश्मीर भागातील द्रास येथील ५ हजार ३९३ मीटर व १७ हजार ६९४ फूट उंचीचे मचोई शिखर यशस्वीरित्या सर केले. संस्थेमध्ये अभ्यासक्रम सुरू असतानाच अरविंदकडे कोर्स सीनिअर म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. लिड-स्पीड-बॉल्डरिंग अशा सगळ्याच क्लायबिंग पद्धतीत त्याने प्रावीण्य मिळवले. क्लायबिंग नर्सरीत २६ नंबरच्या पॅचवर केवळ ३५ सेकंदात लिलया क्लायबिंग केले. नवेले यांनी यापूर्वी जिद्दी माउंटेनिअरिंगच्या माध्यमातून अनेक ट्रेकचे आयोजन करत अनेक कॉलेज तरुणांपासून लहान मुले ते साठी ओलांडलेल्या अनेक व्यक्तींनी नवनवीन किल्ल्यांची पदभ्रमंती घडवली. अनेक सुळक्यांवर स्वतः चढाई करत अनेक तरुणांना चढाई करण्यास प्रशिक्षण दिले. जिद्दीच्या माध्यमातून त्यांनी शाळांतील मुलांचे बेसिक समर कॅम्प घेऊन त्यामधून मूल घडवण्याचेदेखील काम केले आहे तसेच रत्नागिरीतील पर्यटन कसे वाढेल या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील आहेत.

प्रसाद शिगवणांचीही भरारी
अरविंदच्या पावलावर पाऊल टाकत प्रसाद शिगवण यांनीसुद्धा सह्याद्रीतील २१ सुळके यशस्वीरित्या सर केले आहेत. सिक्कीम येथील इंडियन हिमालयन सेंटर फॉर अॅडवेंचर आणि इको टुरिझम येथे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आणि याच कोर्सच्या माध्यमातून ५२०० मीटर, १७ हजार ६० फूट उंचीचे शिखर सर केले. साहसी पर्यटन या क्षेत्रात चांगले कौशल्य प्राप्त करत आहेत.