नेमळेत भातपीक नुकसानीची विमा अधिकाऱ्यांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेमळेत भातपीक नुकसानीची
विमा अधिकाऱ्यांकडून पाहणी
नेमळेत भातपीक नुकसानीची विमा अधिकाऱ्यांकडून पाहणी

नेमळेत भातपीक नुकसानीची विमा अधिकाऱ्यांकडून पाहणी

sakal_logo
By

58646
नेमळे ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातपिकाची पाहणी करताना विमा कंपनीचे अधिकारी.

नेमळेत भातपीक नुकसानीची
विमा अधिकाऱ्यांकडून पाहणी
सावंतवाडी, ता. २५ ः प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेमळे गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीबाबतचा अहवाल कंपनीला सादर केला. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असताना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
भात कापणीला आलेले असताना गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेमळे गावात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐनभरात आलेली उभी भातशेती पावसामुळे आडवी होऊन लोंब्याना कोंब यायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी भात पाण्याखाली गेल्याने कुजलेल्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर नेमळेतील काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये सहभागी होऊन पीकविमा भरला होता. परतीच्या पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली. त्यानुसार विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येत विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाची पाहणी करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवून दिला. यावेळी नेमळे गावातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी उपस्थित होते.