कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध
कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध

कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध

sakal_logo
By

rat25p19.jpg-
58639
रत्नागिरी ः कातळशिल्प संवर्धन करणारी सडये गावातील मुले.

rat25p20.jpg-
L58640
रत्नागिरी पाण्याचे टाके पहिल्या छायाचित्रात, मातृदेवता सड्यावरील भराडणीचे देवस्थान दुसऱ्या छायाचित्रात, आडरानात वसलेले जाखमाता देवस्थान तिसऱ्या छायाचित्रात.

कातळशिल्प, आडवाटांवरील देवतांचा शोध
सड्येतील तरुणांचा उपक्रम; रानवाटा, पाणवटे, भूप्रदेशाची पाहणी

रत्नागिरी, ता. 25 ः अलीकडे गावागावांत मोबाईलच्या चांगल्या रेंजमुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासासोबत सोशल नेटवर्किंग साईटस न्याहाळतात, त्यात ते रमतात; परंतु दिवाळीचे औचित्य साधून आपल्याच गावातील सडा कसा आहे, तिथे बारमाही पाणी देणारे पाणवठे कसे आहेत, आडवाटा, तिथली घनदाट देवराई, जांगलदेव, जाखमाता या आडवाटेवरील देवतांचा शोध आणि कातळशिल्पांचे संवर्धन करण्याच्या हेतूने तरुणांनी उपक्रम राबवला. तालुक्यातील सड्ये गावातील सड्याची सैर युवकांनी एकत्र येत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सडये गावातील मुले, तरुणांची ही जणू पदयात्रा होती. गावातील ज्येष्ठ दत्ताराम खवळे आणि अनंत धुमक यांनी या पदयात्रेच्या आडवाटांचे मार्गदर्शन केले. सुरवातीला माचाण या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर सोमेश्वर देवस्थानच्या वृक्षराजीने नटलेल्या, घनदाट देवराईला भेट देऊन देवराईचे महत्व मुलांना सांगण्यात आले. गुराख्यांचे अर्थात जांगल्यांचे देवस्थान असलेल्या जांगलदेवाला भेट देण्यात आली. पूर्वीच्या काळी गुरे चरत असताना मनोरंजनासाठी गावागावातल्या जांगलदेवस्थानासमोर भजने रंगत असत. त्यातून नवनवीन काव्ये, गाणी यांची निर्मिती होत असे. असे हे जांगलदेव साहित्यिक निर्मितीचे केंद्रस्थान होते.
कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य; पण गुराख्यांना, गुरांना बारा महिने पाणी पुरवणार्‍या पाण्याच्या दगडी टाक्यांना भेट देण्यात आली. रखरखित उन्हातल्या या टाक्यांमध्ये आजही बारा महिने थंडगार पाणी टिकून असते. या नैसर्गिक स्रोतांचे महत्व नव्या पिढीला समजावून सांगण्यात आले. कातळशिल्प हा कोकणच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. सडये-पिरंदवणेच्या सड्यावर भेकर हा प्राणी आणि माणूस ही दोन कातळशिल्पे कातळात नजेसर पडली. मुलांनी त्यावरील माती, रान काढून साफ केली व त्यांच्या रेखांना रंगकाम करून ती सुस्पष्ट केली. त्यांचे संवर्धन व्हावे याकरिता त्यांना दगडी संरक्षण केले. या अनंत धुमक, मारूती धुमक, अमोल पालये यांनी या पदयात्रेचे यशस्वी आयोजन केले होते. या पदयात्रेत हितेश नार्वेकर, सूरज माने, गुरूनाथ धुमक, रोशनी पालये यांसह शालेय विद्यार्थी, तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

चौकट 1

मातृदेवता भराडीण देवी
कोकणातील प्रमुख मातृदेवता श्री भराडीण क्षेत्राला भेट देताना कातळावर असलेल्या 35 फूट लांब आडालाही (विहीर) भेट देण्यात आली. या आडात बाराही महिने पाणी असते. भराडणीच्या देवस्थानात पूजा, आरती, भजन असा कार्यक्रम रंगला. दत्ताराम खवळे यांसह लहान मुलांनी अभंग गायन केले. भराडणीची घाटी उतरून टोळवाड परिसरातील पेशववकालीन उजव्या सोंडेचे मोरेश्वर देवस्थान, भावेआडम गावचे देवस्थान श्री सप्तेश्वर या देवस्थानाला भेट देण्यात आली. या ठिकाणी क्षेत्रदेवता म्हणून अत्यंत आडजागेत वसलेल्या जाखमाता या देवस्थानाला भेट दिली.

चौकट 2
पर्यटनाला चालना
सड्ये गावात अशा कातळशिल्प संवर्धन, संरक्षण मोहिमेतून विविध देवस्थान दाखवताना पर्यटनाला चालना मिळू शकते. याकरिता प्रयत्न करणार असल्याचे या वेळी तरुणांनी सांगितले. युवकांनी येथेच राहून आपल्या गावात काय पाहण्यासारखे आहे हे दाखवले तर गावातच रोजगार मिळू शकतो, असे खवळे यांनी सांगितले.

-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... 25.10.2022