सकारात्मक विचारावर सेमिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मक विचारावर सेमिनार
सकारात्मक विचारावर सेमिनार

सकारात्मक विचारावर सेमिनार

sakal_logo
By

सकारात्मक विचारावर सेमिनार
दाभोळ ः कृषी महाविद्यालय दापोली येथे सकारात्मक विचार कसा करावा या विषयावर एका सेमिनारचे आयोजन केले होते, त्याला विद्यार्थ्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती मालवणकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुष्कर कुलकर्णी, गऊरेश चव्हाण, साहिल जगदाळे, श्रीधर चौधरी, ताहुरा मणियार यांनी परिश्रम घेतले.
--------------
दापोली येथे विंटर सायक्लोथॉन
दाभोळ ः दापोली सायकलिंग क्लबच्यावतीने दापोली विंटर सायक्लोथॉन 2022 चे अर्थात सायकलफेरीचे 6 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी ६ नोव्हेंबरला आझाद मैदान येथून सुरू होणार आहे. यात 5 ते 75 किमी प्रवास असणार आहे. दापोलीतील संस्कृती, निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे सायकल चालवत अनुभवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉ देखील आहे. अधिक माहितीसाठी अंबरीश, पराग केळसकर, संदीप भाटकर, मृणाल खानविलकर, केतन पालवणकर, सूरज शेठ यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------------------
टॉवरची जागा बदलल्याने नेटवर्कची ओरड
दाभोळ ः दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील बीएसएनएलच्या टॉवरची जागा बदलण्यात आल्याने गावातील काही वाड्यांना पुरेसे नेटवर्क मिळत नाही. रेंज असूनसुद्धा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे ऐकायला मिळते. काही ठिकाणी तर घराच्या बाहेर नेटवर्क मिळते. थ्रीजी असूनसुद्धा घरामध्ये टू जी तर घराच्या बाहेर थ्री जी नेटवर्क मिळत आहे. उन्हवरेत काही वस्ती डोंगराळ भागात आहे तर काही वस्ती खाडीकिनारी सखल भागात आहे. यामुळे तळाशी असणार्‍या वाडीवस्तीला सध्या डोंगरावर असलेल्या टॉवरमुळे पुरेसे नेटवर्क मिळत नाही. पूर्वी खाडीकिनारी टॉवर होता. टॉवरच्या उंचीमुळे डोंगराळ व सखल भागातही नेटवर्क मिळत होते. आजूबाजूच्या गावातसुद्धा नेटवर्क पोहचत होते; मात्र बदललेल्या जागेमुळे पांगारी, गोविंदशेत या बहुसंख्य लोकवस्ती असलेली वाडी मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहिली आहे. त्यामुळे मोबाईलधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------
दुतर्फा वाढलेली झाडी धोकादायक
दाभोळः दापोली-केळशीला जोडणाऱ्या व महत्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैाजे दापोली-बांधतिवरे-साकुर्डे-वेळवी- मांदिवली- केळशी रस्त्यावर आंजर्ले खाडीपूल होण्याच्या आधीपासून दापोली-केळशी-मांदिवली अशा एसटीच्या अनेक फेऱ्या सुरू असायच्या. आजही दापोली आगारातून मांदिवली-आतगाव या एसटी बसफेऱ्या सुरू आहेत. सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारी वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कमी रुंदीचा रस्ता, त्यात दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरासमोर आलेल्या वाहनांना मार्ग काढणे खूप अवघड होऊन जात आहे. काही दिवसांपूर्वीच बांधतिवरे येथे समोरून मांदिवली-दापोली ही एसटी बस आली तर दापेालीच्या दिशेने दहाचाकी मोठे वाहन आले. दोन्ही वाहनचालकांना रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अंदाज न आल्याने समोरासमोर अपघात होता होता टळला. त्या वेळी एसटी बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्ता उताराचा असूनही एसटी उलट दिशेने मागे नेऊन सुरक्षित मार्ग काढला.
---------------
भारजा नदीत बेकायदा वाळू उपसा
दाभोळ ः शासनाची बेकायदेशीर वाळू उपशावर बंदी असतानादेखील केळशी-उंबरशेत येथील भारजा नदीवर गेल्या काही दिवसांपासून सक्शन पंपाद्वारे जोरदार वाळू उपसा सुरू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वैशंपायन व आंजर्लेचे मंडळ अधिकारी देवघरकर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. त्या वेळी त्या ठिकाणी जागेवर वाळूचा साठा असल्याचे आढळून आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यासाठी पाईप व होडी आणून ठेवण्यात आली आहे; मात्र हा पंप सुरू होण्याआधी महसूलचे कर्मचारी तिथे पोचल्याने तो तूर्तास बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारजा नदीवर शासनाचा महसूल बुडवून व शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर वाळू व्यवसाय सुरू असल्याने तो बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
----------------