रत्नागिरी- खंडग्रास सूर्यग्रहणाचा खगोलप्रेमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- खंडग्रास सूर्यग्रहणाचा खगोलप्रेमी
रत्नागिरी- खंडग्रास सूर्यग्रहणाचा खगोलप्रेमी

रत्नागिरी- खंडग्रास सूर्यग्रहणाचा खगोलप्रेमी

sakal_logo
By

rat25p41.jpg-
५८६९६ रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राने ग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची दिलेली सुविधा पहिल्या छायाचित्रात, तर ग्लासमधून ग्रहण पाहताना खगोलप्रेमी.

खंडग्रास सूर्यग्रहणाचे २८ टक्के दर्शन

भाट्ये किनारी खगोलप्रेमींची गर्दी; ग्रहण स्थितीतच सूर्यास्त

रत्नागिरी, ता. २५ : रत्नागिरीत खंडग्रास सूर्यग्रहणाची सुरुवात दुपारच्या वेळेत झाली. रत्नागिरीतूनही हे ग्रहण अनेकांनी पाहिले. परंतु, ग्रहणाचा मोक्ष भारतातील सूर्यास्ताच्या वेळेनंतर होणार असल्याने, भारतातून ग्रहणाचा मोक्ष दिसू शकला नाही. रत्नागिरीमधून २८ टक्के सूर्यग्रहण दिसले. शहराशेजारील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राने केली होती. सायंकाळी ४.५५ ते ६.२ वाजेपर्यंत सूर्यग्रहण दिसले. रत्नागिरीमधून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचा मध्यबिंदू ५.४५ ला दिसला. ग्रहण लागलेल्या स्थितीत सूर्यास्त झाल्यामुळे पुढील ग्रहण दिसू शकले नाही.
भाट्ये येथे खगोल अभ्यास केंद्राने दुर्बिणीची व्यवस्था केली होती. दुर्बिणीतून प्रोजेक्ट करून ग्रहण पाहण्याचा व दुर्बिणीतूनही अनेकांनी ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी प्रा. बाबासाहेब सुतार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि १५० खगोलप्रेमी उपस्थित होते. सायंकाळच्या वेळी लालसर आकाशाने ग्रहणाची रंगत वाढवली. समुद्रकिनारे आणि किल्ला, डोंगरावरून अनेकांनी या सूर्यास्तावेळचे ग्रहण पाहिले. गॉगलची काळी काच आणि पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहण्याचा सल्ला दिल्यामुळे खगोलप्रेमींनी त्याची खबरदारी घेतली. अमावास्येच्या दिवशी जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्रबिंबाची सावली जेव्हा सूर्याला अंशतः झाकते तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडून येते. यानंतरचे भारतातून दिसू शकणारे सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहण पाहण्याची योग्य पद्धत म्हणजे अल्युमिनाईज्ड मायलार, ब्लॅक पॉलिमर, वेल्डिंगसाठी वापरली जाणारी १४ नंबरची काच वापरावी, असा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला पाळूनच अनेकांनी ग्रहणाचा आनंद घेतला.
ग्रहण काळात अनेकांनी ग्रहणाचे नियम पाळले. दानाची प्रथाही जपण्यात आली. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यात आले नाही. ग्रहण काळात खाणे-पिणेदेखील निषिद्ध मानल्याने अनेकांनी हे टाळले.
------------------
कोट
‘ग्रहणाला सुरुवात झाली तेव्हा वेल्डिंग ग्लासमधून ग्रहण पाहत होते. वेल्डिंग ग्लासमधूनच मोबाईलवर फोटो काढले. पण आज ढग नसले तर सूर्यास्त चंद्रकोरीप्रमाणे दिसेल, असा अंदाज होता. त्यासाठी कॅमेरा घेऊन भाट्ये ब्रिजवर गेलो. सुरुवातीला नुसत्या सूर्याचे फोटो काढले. सूर्य मावळायला लागल्यावर तो ड्रीम शॉट मिळाला. ग्रहणावेळी सूर्यास्त, समुद्र आणि मासेमारी करणाऱ्या छोट्या बोटी एकाच फ्रेममधे पकडता आल्या. हा अनुभव अविस्मरणीयच.
- पराग पानवलकर, रत्नागिरी.