कुडाळला भात खरेदीची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळला भात खरेदीची लगबग
कुडाळला भात खरेदीची लगबग

कुडाळला भात खरेदीची लगबग

sakal_logo
By

93505

भात खरेदीची कुडाळला लगबग

१४ केंद्रांवर ३०० शेतकऱ्यांची नोंदणी; सहकारी खरेदी-विक्री संघातर्फे १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत भात खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांची एकूण १४ केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. या नाव नोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक करावडेकर यांनी दिली.
आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२२-२३ साठी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाकडून शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चालू पीक पेरा नोंदीचा भात शेतीचा सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स व पासबुकाची झेरॉक्स घेवून भात खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून १० नोव्हेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करून घ्यायची आहे. संघातर्फे कुडाळ एमआयडीसी, कसाल, कडावल, घोटगे, माणगाव, निरुखे, गोठोस, वेताळबांबार्डे, पिंगुळी, निवजे, पणदूर, आब्रड, तुळस, फोंडा येथे भात खरेदी केंद्रे मंजूर केली आहेत. भात खरेदी नोंदणीसाठीची मुदत संपली आहे. तसेच शासनाच्या आधारभूत किमतीत भात खरेदीसाठी पीक पहाणी ॲपद्वारे पीक पाहणीची नोंद असलेला सातबारा आवश्यक आहे. मात्र, या पिक पाहणी ॲपवर नोंदणी करताना अनेक समस्या येत आहेत. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे अद्ययावत अँन्ड्रॉईड मोबाइल नसणे, ॲपमधील गुंतागुंतीची माहिती भरणे व कार्यपद्धती समजून घेणे सामान्य शेतकऱ्यास कठीण आहे. ॲप सुरू करण्यासाठी व वापरण्यासाठी मोबाइल नेटवर्क आवश्यक आहे; परंतु, प्रत्येक गावात इंटरनेटसाठी पर्याप्त नेटवर्क असणे कठीण झाले आहे. तलाठ्यांकडे आधीच असलेल्या कामकाजच्या भारामुळे ते वेळेवर काही वेळा उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सातबारा मिळण्यास विलंब होत असतो. पीक पहाणी ॲपवर नोंद करून सुद्धा काही ऑनलाइन सातबारामध्ये वर्ष २०२२-२३ ची पीक माहिती अद्ययावत होत नाही. त्यामुळे ऑनलाइन सातबारा काढून पुन्हा तलाठ्याकडे जाऊन हाती नोंद घ्यावी लागते. पीक पहाणी ॲपवर नोंद केल्यापासून ४८ तासानंतर सातबारा मिळतो. त्यामुळे शासकीय भात खरेदीच्या मुदतीत सातबारा मिळाल्यावर नोंद करणे अशक्यप्राय आहे. शासकीय भात खरेदी नोंदणी पद्धतीत वारंवार छायाचित्र काढावे लागत असल्यामुळे ३ ते ४ सातबारा असलेल्या एका शेतकऱ्याची नोंदणी होण्यास २० मिनिटे इतका वेळ लागतो. काही शेतकऱ्यांकडे २० ते २५ वेगळे सातबारा आहेत. अशा वेळी १ तासापर्यंत वेळ लागतो व रांगेत असलेल्या शेतकऱ्याचा नाहक वेळ वाया जातो आहे. अशा परिस्थितीत नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा करून नोंदणी कमीत कमी वेळेत व्हावी, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी काही शेतकऱ्यांची मागणी होती, असे श्री. करावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांनी केले आहे.
--
कोट
तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर शासकीय भात खरेदी नोंदणीसाठी कमीतकमी ६० दिवस मुदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाकडे केली होती. यानुसार भात खरेदीच्या नावनोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
- श्री.करावडेकर, व्यवस्थापक, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ.