दुग्धोत्पादनातून मसुरेत रोजगार निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुग्धोत्पादनातून मसुरेत रोजगार निर्मिती
दुग्धोत्पादनातून मसुरेत रोजगार निर्मिती

दुग्धोत्पादनातून मसुरेत रोजगार निर्मिती

sakal_logo
By

58884
मसुरे ः येथे शेतकऱ्यांना हरियाणा येथून आणलेल्या म्हैशींचे वितरण करताना डॉ. विश्वास साठे, शामा सावंत, सतीश बांदिवडेकर, पांडुरंग ठाकूर आणि लाभार्थी शेतकरी.

दुग्धोत्पादनातून मसुरेत रोजगार निर्मिती

‘पावणाई’चा पुढाकार; १२ शेतकऱ्यांना म्हैशींचे वितरण, हरियाणातून जनावरांची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेतर्फे आणि जिल्हा बँक, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि गोकुळ दूध उत्पादक संघ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून मसुरे परिसरातील बारा शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्यासाठी २५ म्हशी अनुदान तत्त्वावर रोजगार निर्मिती म्हणून देण्यात आल्या.
मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेने एक अनोखा उपक्रम राबविला आहे. यामुळे मसुरे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी दूध उत्पादनातून निर्माण झाली आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांनी या संस्थेसह सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखा आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ‘गोकुळ’चे आभार मानले. मसुरे परिसरामध्ये दूध उत्पादनाची नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून एक प्रकारची क्रांती घडून आली आहे.
मसुरे येथील पावणाई देवी संस्था ही सद्यस्थितीत दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. येथील शेतकऱ्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी दूध उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा अलका साठे, डॉ. विश्वास साठे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. मसुरे-बांदिवडे येथे या सर्व म्हशी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. यावेळी अलका साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शामा सावंत, बांदिवडे माजी सरपंच सतीश बांदिवडेकर, पांडुरंग ठाकूर, सिद्धेश मसुरकर, आबा मसुरकर, तुळशीदास चव्हाण, स्वप्नील ठाकूर, अभी घाडीगावकर, जय बांदिवडेकर, मारुती सावंत, सुमेध सावंत, अभी दुखंडे, सिद्धेश गिरकर, गणेश बांदिवडेकर, लखन बांदिवडेकर, महेंद्र हिर्लेकर आणि हरियाणा येथील मार्गदर्शक शेतकरी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्यावतीने येथील शेतकऱ्यांना अनुदानपर कर्ज सहकार्य केले असून अण्णासाहेब पाटील महामंडळाचेही मोठे सहकार्य आहे. मसुरे परिसरातील शेतकरी बांधवांनी हरियाणा येथे जाऊन या दुधाळ म्हशींची पाहणी करून माहिती घेतली होती.
...............
चौकट
२५ म्हैशींची खरेदी
संस्थेने मसुरे परिसरातील शेतकऱ्यांसाठी हरियाणा राज्यातून रिंग मुरा व मुरा जातीच्या २५ म्हैशी खरेदी करून मसुरे येथे प्रायोगिक स्वरुपाच्या तत्त्वावर एक उपक्रम म्हणून येथील बारा शेतकऱ्यांना आज सकाळी वितरित केल्या. या जातीतील एक म्हैस दिवसाला सुमारे १५ लिटर दूध देत असून यातून सुमारे सातशे रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. यासाठी प्रतिदिन सुमारे २५० ते ३०० रुपये खर्च आहे.
--
कोट
प्रायोगिक तत्त्वावर या दूध उत्पादक संस्थेने येथील शेतकऱ्यांना सधन बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून यातून शेतकऱ्यांनी उन्नती साधावी. भविष्यातही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येतील. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक मसुरे शाखा, अण्णासाहेब पाटील महामंडळ, गोकुळ दूध उत्पादक संघाने मेहनत घेतली.
- डॉ. विश्वास साठे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस