चिपळूण - ऑनलाईन विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - ऑनलाईन विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका
चिपळूण - ऑनलाईन विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका

चिपळूण - ऑनलाईन विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका

sakal_logo
By

58951
...............................
ऑनलाइन विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका
स्थानिक विक्रेत्यांचे नुकसान; कोट्यवधीची उलाढाल थंडावली
चिपळूण, ता. २८ ः दिवाळीच्या निमित्ताने कोविडचे कोणतेही निर्बंध नसल्याने नागरिकांनी मनसोक्त खरेदी केली. हा सण कॅश करण्यासाठी व्यापाऱ्यांसह ऑनलाइन कंपन्यांनी चांगलीच सूट दिली. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती मिळाली. ऑनलाइन संस्कृतीचा फटका लहान व मध्यम विक्रेत्यांना बसला आहे. कोट्यवधींच्या उलाढालीत स्थानिक विक्रेत्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.
कोरोना, महापुरातून स्थानिक व्यापारी उभारी घेत आहे. नागरिकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक दुकानातून खरेदी करावी अशी हाक व्यापाऱ्यांनी दिली होती; मात्र ऑनलाइन कंपन्यांनी ३० ते ४० टक्क्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विशेष सूट देण्यात आली. अवघ्या तीन ते चार दिवसात वस्तू घरपोच मिळत असल्याने यावर्षी दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिक अडचणीत सापडले. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणांसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसात घरपोच मिळतात. या वस्तूंत तांत्रिक अडचण असेल तर परत करण्याची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल ऑनलाइनकडे वाढला आहे. ऑफर्स आणि सूटच्या जाळ्यात ग्राहक ऑनलाइन खरेदीत अ़डकत चालले आहेत. त्यामुळे दिवाळीत शहरातील दुकानांमध्ये तुरळक गर्दी बघायला मिळाली. तरुणाई इंटरनेटवर जास्त वेळ व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीत तरुणांची संख्या जास्त आहे. पालकांनाही मुले ऑनलाइन खरेदी करण्यास प्रवृत्त करतात.
----------
चौकट
असंख्य पर्यायामुळे खरेदी सुलभ
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना कंपन्यांकडून संकेतस्थळावर चित्र दिले जाते. ग्राहक त्या चित्राला बघूनच बुकिंग करतात तर दुसरीकडे बाजारात गेल्यास पसंती करून खरेदी करताना दुकानदाराला वेठीस धरले जाते. ऑनलाइन खरेदीत ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध असतात. त्या तुलनेत दुकानात मात्र तेवढे पर्याय उपलब्ध होत नाहीत.
---------
कोट
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या होत्या. दुकानात नवीन माल भरला होता; परंतु नागरिकांना घरात बसून ऑनलाइन खरेदी करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के विक्री मंदावली.
- मयूर कदम, कापड व्यापारी, चिपळूण