दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा जिल्ह्यात व्यावसायिकांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा
जिल्ह्यात व्यावसायिकांना फटका
दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा जिल्ह्यात व्यावसायिकांना फटका

दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा जिल्ह्यात व्यावसायिकांना फटका

sakal_logo
By

दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा
जिल्ह्यात व्यावसायिकांना फटका
सावंतवाडी ः दिवाळीच्या निमित्ताने कोविडचे कोणतेही निर्बंध नसल्याने नागरिकांनी मनसोक्त खरेदी केली. हा सण कॅश करण्यासाठी व्यापाऱ्यांसह ऑनलाइन कंपन्यांनी चांगलीच सूट दिली. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती मिळाली. ऑनलाइन संस्कृतीचा फटका लहान व मध्यम विक्रेत्यांना बसला आहे. कोट्यवधींच्या उलाढालीत स्थानिक विक्रेत्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. कोरोना, महापुरातून स्थानिक व्यापारी उभारी घेत आहे. नागरिकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक दुकानातून खरेदी करावी अशी हाक व्यापाऱ्यांनी दिली होती; मात्र ऑनलाइन कंपन्यांनी ३० ते ४० टक्क्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विशेष सूट देण्यात आली. अवघ्या तीन ते चार दिवसात वस्तू घरपोच मिळत असल्याने यावर्षी दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिक अडचणीत सापडले. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणांसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसात घरपोच मिळतात. या वस्तूंत तांत्रिक अडचण असेल तर परत करण्याची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल ऑनलाइनकडे वाढला आहे. ऑफर्स आणि सूटच्या जाळ्यात ग्राहक ऑनलाइन खरेदीत अडकत चालले आहेत. त्यामुळे दिवाळीत शहरातील दुकानांमध्ये तुरळक गर्दी बघायला मिळाली. तरुणाई इंटरनेटवर जास्त वेळ व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीत तरुणांची संख्या जास्त आहे. पालकांनाही मुले ऑनलाइन खरेदी करण्यास प्रवृत्त करतात.
--
कर्करोगग्रस्तांना दिलासा
मुंबई : पालिकेच्या सायन रुग्णालयात लवकरच रेडिएशन थेरपी उपलब्ध होणार असून त्यामुळे कर्करोगग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. कर्करोगग्रस्तांना उच्च दर्जाची रेडिएशन थेरपी आणि उपचार देणारे पालिकेचे सायन रुग्णालय पहिले ठरेल, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
सायन रुग्णालयात कर्करोगाबाबतचे निदान, बायोप्सी, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. साधारण दर महिन्याला ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. दरवर्षी किमान सहा ते आठ हजार रुग्णांवर केमोथेरपी उपचार केले जातात. पण शेवटच्या टप्प्यातील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेडिओ थेरपीसाठी कर्करुग्णांना ‘सायन’मधून टाटा किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जाते. टाटा रुग्णालयातही रेडिओ थेरपीसाठी किमान सात ते आठ महिने किंवा वर्षभर प्रतीक्षा यादी असते. खासगी रुग्णालयात रेडिओ थेरपीसाठी किमान तीन ते साडेतीन लाख रुपये मोजावे लागतात. कर्करुग्णांच्या उपचारांसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी रेडिओ थेरपी दिली नाही तर कर्करोग पुन्हा बळावू शकतो. अशा उपचारांसाठी रेडिएशन थेरपीची मल्टिपल मशीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची मल्टिपल मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावावर अंतिम प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मल्टिस्पेशालिटी इमारत तयार करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
---
‘बुलेट’ला तांत्रिक अडथळा
वसई : पालघर जिल्ह्यात अनेक विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातील केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेन हा असून पालघर जिल्ह्यातून तो जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी २०२३ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे.
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा महामार्ग, वसई अलिबाग कॉरिडॉर, विरार ते वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प, वसई पनवेल कॉरिडॉर, कोस्टल रोड यांसारखे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प होणार आहेत. या प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरण करणे, मालकांना त्याचा मोबदला देणे यासह विविध विभागांच्या परवानग्या आदी कामे केली जात आहेत. पाच वर्षांपूर्वी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई व अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार, अशी घोषणा केली होती. या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमी अंतर केवळ २ तासांत गाठता येणार आहे. खासगी व वनविभागाची जागा बुलेट ट्रेनसाठी संपादित केली जाणार आहे. याकरिता भूसंपादनाचे काम व सर्व्हे केला गेला. या प्रकल्पाला अगोदर जागा देण्यास विरोध करण्यात आला होता; परंतु प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे या प्रकल्पाचे अवघे १० टक्के जागेचे भूसंपादनाचे काम रखडले आहे.
--
श्रीधर पवार यांना काव्य पुरस्कार
चिपळूण ः सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिला जाणारा उत्तम पवार स्मृतीप्रित्यर्थ ‘उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ चिपळूण तालुक्याचे सुपुत्र असणाऱ्या डॉ. श्रीधर पवार यांना त्यांच्या ‘अर्धे आकाश माथ्यावर’ या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. तसेच आ सो तथा आबा शेवरे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा ''आ बा शेवरे जीवनगौरव पुरस्कार'' ज्येष्ठ लेखिका व आंबेडकरी विचारवंत उर्मिलाताई पवार यांना जाहीर करण्यात आला असून, हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी (ता. २९) मुंबईत दादर येथे पार पडणार आहे. पुरस्कार वितरणाला ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, साहित्यिक मोतीराम कटारे, डॉ. महेश केळुसकर, डॉ. शामल गरुड, डॉ. सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. श्रीधर पवार हे चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र आहेत.
---
विरारमध्ये गदिमा साहित्य संमेलन
विरार : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अंतर्गत कोकण प्रदेशच्यावतीने विरारमधील विद्याविहार इंग्लिश हायस्कूलमध्ये गदिमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भूपेंद्र संखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर दांडेकर यांची उपस्थिती होती. या संमेलनाचे उद्‌घाटन डॉ. मंगला परब यांच्या हस्ते करण्यात आले; तर डॉ. अ. ना. रसनकुटे हे स्वागताध्यक्ष होते. सुधीर दांडेकर यांनी साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच वाचन संस्कृती टिकवण्याचे महत्त्व पटवून दिले. स्वागताध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांनी ग. दि. माडगूळकरांची कारकीर्द कशी घडली याबद्दल सविस्तर विवेचन केले. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष शुभम पाटील आणि उपाध्यक्षा मंजूषा गवई यांनी कवितांचे संकलन केले. याप्रसंगी भूपेंद्र संखे यांच्या ‘शब्दवेल’ या काव्यसंग्रहाचे डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
---
चित्ररथावर फुटबॉलचा महासंग्राम
नवी मुंबई ः नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद नवी मुंबई शहराला मिळाले असल्याने महापालिकेने फुटबॉलच्या थिमवर तयार केलेल्या प्रचार रथाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने संपूर्ण जगभरातून फुटबॉलप्रेमी क्रीडा रसिक व स्पर्धेत सहभागी देशांच्या संघांतील महिला खेळाडू नवी मुंबईत आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये फुटबॉलच्या चित्रभिंती, मुख्य चौकातील फुटबॉलच्या शिल्पाकृती, हवेत सोडलेले फिफा स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी एअर बलुन्सने नवी मुंबई शहर सजलेले आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांमध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल खेळाविषयी व्यापक प्रचार-प्रसिद्धी होत आहे. अशातच सध्याच्या ऑनलाईन युगात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना विशेष जिंगल देखील मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित केलेली आहे. यासोबतच शहरभर फुटबॉल खेळाची व फिफा स्पर्धेची व्यापक प्रसिद्धीसाठी फुटबॉल प्रचार रथ निर्माण करण्यात आला आहे.