उपवडे शाळेस नियोजनात प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपवडे शाळेस नियोजनात प्राधान्य
उपवडे शाळेस नियोजनात प्राधान्य

उपवडे शाळेस नियोजनात प्राधान्य

sakal_logo
By

59061
उपवडे ः शाळा इमारत पाहणी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. शेजारी बीडीओ विजय चव्हाण, सदानंद गवस, मनोहर दळवी आदी.


उपवडे शाळेस नियोजनात प्राधान्य

सीईओ नायर यांची ग्वाही; पालकांनी आवाज उठवताच इमारतीच्या दयनीय अवस्थेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः माणगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद शाळा उपवडे नं. १ या धोकादायक शाळेत मुले पाठविली जाणार नाहीत, असा निर्धार पालकांनी करताच जिल्हा प्रशासन खडबडुन जागे झाले. गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शाळेला भेट देत इमारतीची दयनीय अवस्था पाहिली. यावेळी नायर यांनी शाळेची इमारत जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात अग्रक्रमाने घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे पालकामंधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कुडाळ तालुक्यातील उपवडे नं. १ या शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. गेली पाच वर्षे याबाबत तालुका व प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले गेले; मात्र याकडे संबंधित यंत्रणांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. तीन महिन्यांपूर्वी शाळेच्या या इमारतीचे छप्पर कोसळले. सुदैवाने त्या दिवशी शाळेत मुले नसल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे छप्पर कोसळल्यानंतर शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने शाळेला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली नाही. त्यामुळे पालक संतप्त झाले होते. अखेर पालकांनी ११ नाव्हेंबरपासुन शाळेत मुले न पाठविण्याचा निर्णय दिवाळीपूर्वीच घेत त्याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. पालकांच्या निर्णयानंतर प्रशासनाला जाग आली असून कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पथकाने २२ ला शाळेला भेट देत पाहणी करून आपला अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी नायर यांनी पालकांना दिलेल्या शब्दानुसार गुरुवारी (ता. २७) शाळेला भेट दिली. त्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करत या ठिकाणी दोन इमारती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
---
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची सूचना
जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात शाळेच्या इमारतीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. पालकांनीही पालकमंत्र्यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधावे, अशी सूचनाही सीईओ नायर यांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उपसरपंच सदानंद गवस, माजी उपसरपंच मनोहर दळवी, विस्तार अधिकारी संजय आरोसकर, विस्तार अधिकारी विनायक पाटील, ग्रामसेविका सावंत, मुख्याध्यापक सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.