अठरा लाखांच्या शौचालयात 10 रुपयांचा नळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अठरा लाखांच्या शौचालयात 10 रुपयांचा नळ
अठरा लाखांच्या शौचालयात 10 रुपयांचा नळ

अठरा लाखांच्या शौचालयात 10 रुपयांचा नळ

sakal_logo
By

rat२९p४.jpg
५९०५४
पेठमापः येथील शौचालयाला हलक्या दर्जाचे नळ बसण्यात आले आहेत.
--------------
अठरा लाखांचे शौचालय दर्जाहीन
चिपळूण पालिकेवर नाराजी; गोवळकोटरोडमधील कामाबाबत ओरड, साफसफाईकडेही दुर्लक्ष
चिपळूण, ता. २९ः पेठमाप येथील शौचालयाचे काम ठेकेदाराने घाईगडबडीने पूर्ण केले. या शौचालयाच्या बांधकामासाठी मातीमिश्रित वाळू वापरण्यात आल्याने आणि लाद्या व अन्य साहित्य कमी दर्जाचे वापरल्याने वादग्रस्त बनला होता; मात्र आता हेच शौचालय वेगळ्याच मुद्द्यासाठी चर्चेत आले आहे. सुमारे १८ लाख रुपयांच्या शौचालयात १० रुपयांचा प्लास्टिकचा नळ जोडल्याने या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील पेठमाप परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे येथील घरेही एकमेकांना लागून बांधण्यात आली असून अनेक घरे जागेअभावी एकत्रित आहेत. त्यामुळे वैयक्तिक शौचालये उभारणे येथे शक्य नाही. नागरिकांची गरज ओळखून पालिकेने काही वर्षापूर्वीच येथे सार्वजनिक शौचालय उभारले होते. त्याचा उपयोग नागरिक करत होते; मात्र ते नादुरुस्त झाल्याने नवे बांधण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आपल्या ५८/२ या विशेष अधिकाराचा वापर करून या शौचालयासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला होता; मात्र सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी या कामावर आक्षेप घेत त्याची तक्रार केली. त्यामुळे हे काम रखडले होते. नागरिकांची गरज ओळखून मुख्याधिकारी शिंगटे यांनी प्रलंबित प्रशासकीय बाबी पूर्ण करून हे काम करण्याचे ठेकेदाराला आदेश दिले. त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे १८ लाख रुपये खर्च करून हे काम अत्यंत घाईघाईने केले. मुकादम यांनी पुन्हा कामाच्या दर्जावर आक्षेप घेतला. काम अंदाजपत्रकानुसार होत नसून त्याची चौकशी करण्याची मागणी मुख्याधिकारी शिंगटे यांच्याकडे केली होती. त्यानंतरही घाईघाईने हे काम पूर्ण करण्यात आले.
पालिकेकडून शौचालय व त्या संबंधित सुविधा देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करत आहे; परंतु या कामात योग्य दर्जा राखला जात नसल्याची ओरड केली जात आहे. गोवळकोटरोड येथील आठ सीटच्या शौचालयासाठी बसवण्यात आलेले नळ प्लास्टिक स्वरूपाचे आहेत. ज्याची किंमत अवघी १० रुपये आहे. याच पद्धतीने बेसिन व अन्य साहित्यही दर्जेदार नसल्याची ओरड केली जात आहे. त्यातच नवीन शौचालयाची साफसफाईही वेळोवेळी केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
--------------
कोट
मागील दोन वर्षात सार्वजनिक शौचालयांची जागोजागी कामे झाली. या शौचालयांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे; परंतु सर्व कामे बोगस झाली आहेत. तेव्हा मागील दोन वर्षातील सर्व शौचालयांच्या कामाची चौकशी करण्यात यावी. या विषयी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक, चिपळूण.