वेध वारी वारी जन्म मरणाते वारीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेध वारी वारी जन्म मरणाते वारीचे
वेध वारी वारी जन्म मरणाते वारीचे

वेध वारी वारी जन्म मरणाते वारीचे

sakal_logo
By

संस्कृती .....................लोगो

rat29p12.jpg -
L59134
अंजली बर्वे

इंट्रो

दिवाळीनंतरचा उत्साह वाढवणारा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. आषाढी, कार्तिकीची वारी म्हणजे मराठी संस्कृतीचा अभिमानाने मिरवता येईल असा वारसा. हजारो वर्षांच्या वारीचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवावा असा सोहळा. तो फार फार वर्षांपूर्वी होता, आजही आहे आणि पुढे पुढे वर्षानुवर्ष टिकेल. ही पांडुरंगाची कृपा की भक्तीचा ठसा. समाजाचा आरसा की परंपरेचा वसा? सत्संग, सहप्रवास, सहभोजन, संतविचारांची देवघेव, अंतर्बाह्य सुसंस्कार, शुचिता आणि अखंड, अविरत नामघोष. बास आणि काय पाहिजे? न लगे मुक्ती, धनसंपदा! त्या सावळ्याजवळ काहीही मागायचे नाही. वारी वारी जन्म मरणाते वारी! खूप काही शिकवून जाते ही वारी. आषाढी ते कार्तिकी सामाजिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक स्तर उंचावतात हे नक्की.
- अंजली बर्वे, चिपळूण
-----------------------------------
वेध वारी वारी जन्म मरणाते वारीचे

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध जातीचे लोक एका ओढीने वारीला निघतात. एकमेकांना भेटतात, एकमेकांत परमेश्वर पाहून नमस्कार करतात. किती उदात्त, मंगल संस्कार करते ही वारी! नीट विचार केला तर ही वारी म्हणजे केवळ हिंदू देवतांचे पूजन, अर्चन नाही, भक्तीचा प्रदर्शन हेतू नाही किंवा आजच्या भाषेत शक्तीप्रदर्शन नाही. ग्यानबा तुकारामाचा गजर म्हणजे केवळ नामसंकिर्तन नाही तर या संतांनी दिलेले विचार, त्यांचा दृष्टिकोन स्वीकारण्याची वृत्ती आहे ही वारी! हे सर्व संत क्रांतिकारक विचारांचे होते. भक्ती आणि वारीच्या निमित्ताने त्यांनी समन्वय घडवून आणला. गरीब, श्रीमंत, विविध जातीत विभागलेला समाज वारीच्या सेतूने एकत्र आला.
ज्या काळात शैव वैष्णव वाद विकोपाला गेला होता आणि त्याची लागण महाराष्ट्रातही होऊ घातली होती त्या काळात आमच्या विठूरायाच्या मस्तकी असलेल्या शिवलिंगाला तुळस वाहिली जात होती. या प्रथा, परंपरा ज्या संतांनी सुरू केल्या त्यांच्या दूरदृष्टीचा गौरव करावा तेवढा थोडा. उभे गंध की आडवी गंधरेखा हा वादच नको म्हणून वारकऱ्यांच्या कपाळावर टिळा शोभू लागला. ही प्रथा संत एकनाथांनी सुरू केल्याचा उल्लेख सापडतो.आणि या विचारांची रूजवण वेळीच झाली नसती तर महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती आली असती. रक्ताचा थेंबही महाराष्ट्रात सांडला नाही याचे श्रेय या संतांचे, माऊलींच्या प्रभावळीचे. त्यामुळे वारीकडे पाहताना ती वारी म्हणजे एका संकल्पाने निघालेली ईश्वरनिष्ठेची मांदियाळी आणि समानतेच्या टाळ, मृदुंग, गजराची ती दिंडी होय. मानवी मन विश्वमनाशी संवाद साधू पाहात आहे. अध्यात्मात जेवढे एकांताला महत्त्व आहे तेवढेच समाजात मिसळण्याला आहे. माणसे एकत्र आली की जातीपातीचे फणे उभे राहतात.
अपेक्षा, कामना यांच्यात तू तू मी मी होते. श्रीमंतांना किंवा बुद्धिवंतांना ''गं ची बाधा होते, गरिबांना गरीब असण्याची खंत सतावते; परंतु वारीचा अनुभव फार वेगळाच! ''सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवरू'' हीच भावना भरून राहते. या वारीला रत्नागिरीतल्या अनेक गावातूनही दिंड्या निघतात. आषाढ आणि कार्तिकीमध्ये पावलांना ओढ लागते त्या समचरणांची. सुसंगती, प्रेम, आनंद, शांती, संतोष, भक्ती, प्रिती या भावनांची पूर्ती करणारी ही वारी. मनाला खरेच दुसरे काय हवे असते? इंद्रायणीमध्ये स्नान करते ते फक्त शरीर. मन तर या भावनांनी चिंब भिजत असते. आंतरिक सौंदर्याने बहरत असते.
मनाचे हे स्नान अत्यावश्यक आहे, हीच खरी विठोबाची पूजा आहे. त्याचे दर्शन कशाला हवे? त्याने संतांमार्फत दिलेला संदेश हाच प्रसाद म्हणून स्वीकारायचा आहे. केवळ धार्मिक कर्मकांडाच्या आहारी न जाता स्वाभिमानासह समन्वय साधता येण्यासाठी एकतरी वारी अनुभवावी.