साखर निर्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर निर्यात
साखर निर्यात

साखर निर्यात

sakal_logo
By

साखर निर्यातीवरील निर्बंध वाढविले
....................
सरकार देणार कोटा; केंद्राच्या परवानगीनेच करावी लागणार निर्यात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः खुल्या साखर निर्यातीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत. केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय साखर निर्यात करता येणार नाही, असे आदेश केंद्र सरकारने गेल्या वर्षी काढले होते. त्याची मुदत सोमवारी (ता. ३१) संपत होती, पण याला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे आदेश आज केंद्र सरकारने काढले.
पूर्वी साखर कारखान्यांना हवी तेवढी साखर निर्यात करता येत होती. गतवर्षी यासंदर्भातील धोरण ठरविताना त्यात बदल करून केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय साखर निर्यात करता येणार नाही, असे आदेश काढण्यात आले. त्यासाठी कारखानानिहाय कोटाही ठरवून देण्यात आला होता. या निर्णयाचा फटका सर्वांत जास्त साखर निर्यात करणाऱ्या महाराष्ट्राला बसला. यावर्षी या धोरणात बदल होईल, अशी उद्योगाची अपेक्षा असतानाच हेच धोरण पुन्हा वर्षभर कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
साखर निर्यातीचे मुक्त धोरण असेल तर मोठ्या प्रमाणात साखर निर्यात होऊ शकते. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे भाव स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर पुढील हंगामाच्या तोंडावर कारखान्यांकडील साखरेचा साठाही नियंत्रित ठेवता येतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा पुरेसा होत असल्याने उद्योगालाही दिलासा मिळत होता. पण, केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय साखर निर्यात करता येत नसल्याने उत्तर प्रदेशसह काही राज्यांत कारखान्यांना मिळालेला निर्यातीचा कोटा विकून पैसे मिळविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यावर निर्बंध आणण्याऐवजी सरकारने आहे त्याच धोरणाला पुन्हा मुदतवाढ दिली.
गतवर्षीच्या हंगामात सुमारे ११२ लाख टन साखर निर्यात झाली. यापैकी तब्बल ७० लाख टन साखर एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहे. उत्तर प्रदेशात साखर निर्यातीच्या सुविधाच अपुऱ्या आहेत. दुसऱ्या राज्यातून साखर निर्यात करणे त्यांना परवडत नाही. परिणामी, अशा राज्यांतून साखर निर्यात होत नाही. त्यातून मिळालेला निर्यात साखरेचा कोटा विकला जात असल्याचे पुढे आले आहे.
....................
१८ टक्के कोटा शक्य
गेल्या वर्षीच्या हंगामातील डिसेंबर ते जानेवारी २०२२ या काळात उत्पादित झालेल्या एकूण साखरेच्या १८ टक्के साखर निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला त्याच पटीत साखर निर्यातीचा कोटा मिळेल.
...............
पूर्वीचे साखर निर्यातीचे धोरण नव्या आदेशाने कायम ठेवले, ही चांगली बाब आहे. तथापि, जे कारखाने साखर निर्यात करीत नाहीत, त्यांचा कोटा निश्‍चित करताना संबंधित कारखान्यांनी हा कोटा कोणालाही विकायचा नाही, अशी अट केंद्र सरकारने घालण्याची गरज आहे. या व्यवहारातून साखर निर्यात न करता काळाबाजार होतो, त्याला आळा बसेल.
- पी. जी. मेढे
साखर उद्योगाचे अभ्यासक
...............
दृष्टिक्षेपात साखर निर्यात (२०२१-२२)
देशातील एकूण साखर निर्यात- ११२ लाख टन
महाराष्ट्रातून झालेली निर्यात- ७२ लाख टन
उत्तर प्रदेश- १० लाख टन
कर्नाटक- १८ लाख टन
अन्य राज्ये- १० लाख टन
...........