पान एक-मालवणचे पर्यटन ''हाऊसफुल्ल'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मालवणचे पर्यटन ''हाऊसफुल्ल''
पान एक-मालवणचे पर्यटन ''हाऊसफुल्ल''

पान एक-मालवणचे पर्यटन ''हाऊसफुल्ल''

sakal_logo
By

swt2933.jpg
५९१६९

मालवण ः दिवाळी सुटीनिमित्त आलेल्या पर्यटकांमुळे येथील किनारे गजबजले आहेत.

मालवणमध्ये पर्यटन ‘हाउसफुल्ल’
दिवाळी हंगाम बहरला; निवास व्यवस्था पडतेय अपुरी
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : दिवाळी सुटीत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पर्यटकांमुळे येथील पर्यटन बहरले आहे. तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, तळाशीलसह आचरा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून गेला आहे. साहसी जलक्रीडा प्रकारांचा पर्यटकांकडून आनंद लुटला जात आहे. पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेल्याने निवास व्यवस्था अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीपूर्वी मुसळधार पावसामुळे पर्यटनावर परिणाम झाला होता. हवामान खात्याने वादळाचा अंदाज व्यक्त केल्याने ऐन दिवाळीत पावसाचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे दिवाळी सुटीतील पर्यटन धोक्यात आले होते. परिणामी पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते; मात्र वादळ बांगलादेशच्या दिशेने सरकल्याने पर्यटन व्यावसायिकांची चिंता मिटली. दिवाळी सुटीतील पहिल्या तीन दिवसांत पर्यटकांचा ओघ कमी होता; मात्र दिवाळी पाडव्यानंतर येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. अनेक पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली, परंतु अन्य पर्यटकांची निवासव्यवस्था न झाल्याने त्यांनी किल्ले सिंधुदुर्ग, जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटून माघारी परतणे पसंत केले. काही पर्यटन व्यावसायिकांनी तर आपल्या घरातच पर्यटकांची निवासाची व्यवस्था केल्याचे दिसून आले.
शहरातील चिवला, दांडी, बंदर जेटी, तारकर्ली, देवबाग, वायरी येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेल्याचे चित्र आहे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन तसेच अन्य पर्यटन स्थळांनाही पर्यटक भेटी देत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय होत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांमुळे बाजारपेठेतही चांगली उलाढाल होत आहे.
बाजारात किमती मासळी उपलब्ध असल्याने मत्स्यखवय्यांकडून या मासळीचा आनंद लुटला जात आहे. सुरमई ८०० रुपये किलो, पापलेट ८५० रुपये, कोळंबी ५५० रुपये किलो तर बांगडा १०० रुपये टोपली या दराने उपलब्ध होती. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे अनेक हॉटेल्समध्ये सायंकाळी, तसेच रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत जेवणावळी सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत पर्यटकांनी बुकिंग केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथे पर्यटकांचा ओघ कायम राहणार आहे.
येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक आपल्या खासगी वाहनांनी येथे दाखल होतात. इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यटकांकडून गुगल मॅपचा वापर केला जातो; मात्र गुगल मॅपवर अनेक ठिकाणचे मार्ग चुकीचे दाखविले गेल्याने पर्यटकांना पुन्हा त्याच मार्गावरून माघारी परतावे लागते. यात एकदिशा मार्गाचे उल्लंघन तर होतेच, शिवाय वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. सध्या शहरातील नाक्यांवर दोनच वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करणे आवश्यक बनले आहे.
....
आणखी आहेत अपेक्षा
सागरी पर्यटन, समुद्राखालील अनोखे विश्व आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारी ताजी मासळी याचा आस्वाद लुटण्यासाठीच येथे पर्यटक दाखल होत आहेत; मात्र दिवसभराच्या पर्यटनानंतर सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना आकर्षित करणारी कोणतीही सुविधा नसल्याची उणीव भासत आहे. याचा विचार करता किल्ल्यावर रोषणाई, आकाश दर्शन यासारखे उपक्रम राबविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होण्याची गरज पर्यटनप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
...............
मोबाईल नेटवर्क विस्कळीत
दिवाळी सुटीत मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे मोबाईल नेटवर्क जाम झाले आहे. याचा फटका पर्यटकांबरोबरच व्यावसायिकांनाही बसत आहे. नेटवर्क जाम समस्येमुळे सर्वसामान्यही हैराण झाले आहेत.

कोट
‘दिवाळी सुटीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील याचा अंदाज व्यावसायिकांना नव्हता. अचानक मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे व्यावसायिकांची सध्या तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. मालवणसह वेंगुर्ले, देवगड या किनारपट्टी भागातील निवासव्यवस्था ''फुल्ल'' झाल्याने पर्यटकांनी कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत निवासाची व्यवस्था उपलब्ध करून घेतली आहे. या सर्वाचा विचार करता आता शासनाने पर्यटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती, पर्यटकांची सुरक्षितता याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.’
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक