‘भुयारी गटार’चा वनवास संपेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भुयारी गटार’चा वनवास संपेना
‘भुयारी गटार’चा वनवास संपेना

‘भुयारी गटार’चा वनवास संपेना

sakal_logo
By

59170
मालवण ः भुयारी गटार योजनेचे चेंबर
59171
मालवण ः भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरात अशी खोदाई करण्यात आली होती.
59172
मालवण ः योजनेच्या कामाची पाहणी करताना तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह.
59173
मालवण ः सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाची इमारत.
................

‘भुयारी गटार’चा वनवास संपेना

मालवणातील प्रकल्प; तब्बल १२ वर्षे पूर्णत्वाची प्रतीक्षा

लीड
मालवण पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला भुयारी गटार योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप मार्गी लागलेला नाही. सद्यःस्थितीत या योजनेचे ४१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, २ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असणारी दीड कोटी रुपयांची मशिनरी न बसविल्याने ही योजना कार्यान्वित झालेली नाही. परिणामी ही योजना मार्गी लागणार की, हे घोंगडे भिजतच राहणार, असा प्रश्‍न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. वाढते पर्यटन, सांडपाण्याची निर्माण होत असलेली गंभीर समस्या विचारात घेता योजनेच्या अकार्यक्षम ठेकेदारामुळे जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता भुयारी गटार योजना मार्गी लावणे गरजेचे आहे. यादृष्टीने नगरविकास खात्यासह प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करायला हवी.
- प्रशांत हिंदळेकर
...............
योजनेचा उद्देश
शहरातील हॉटेलिंग, खानावळ व्यवसाय, अपार्टमेंट, दाट वस्तीतील नागरिकांना सांडपाण्याच्या निचऱ्याची गंभीर समस्या भेडसावत होती. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगराईच्या साथींनाही सामोरे जावे लागत होते. या सर्वांचा विचार करता तसेच शहरातील वाढते पर्यटन आणि भविष्याचा विचार करता भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी तसेच पालिका प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यानंतर २००७ मध्ये भुयारी गटार योजनेच्या कामास केंद्राकडून तांत्रिक मंजुरी मिळाली. त्यानंतर सुमारे १८ कोटी ८४ लाखांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला. त्यानुसार २००९ मध्ये या योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली.
................
योजनेचा रखडलेला मुहूर्त
शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता या योजनेसाठी वापरले जाणारे पाईप हे भविष्याचा विचार करता न टिकणारे असल्याने ‘एचडीपीई’ पाईपलाईन वापरण्याची सूचना केली. यात पुन्हा या योजनेच्या डिझाईनमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले. यात तीन वर्षांचा कालावधी गेला. या योजनेसाठी शहरातील सर्व भागांतील रस्ते खोदल्याने त्याचा त्रास नागरिकांसह व्यापाऱ्यांना परिणामी बाजारपेठेस भोगावा लागला. सुधारित डिझाईनला मान्यता मिळाल्यानंतर २०१२ मध्ये भुयारी गटार योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
.................
जबाबदारी कोणावर?
भुयारी गटार योजनेच्या कामात पहिल्यापासूनच त्रुटी दिसून आल्या. त्याचबरोबर संबंधित ठेकेदार सक्षम नसल्याने त्याच्या कामावर तत्कालीन नगरसेवकांनी आक्षेप घेत नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्याची मागणी केली. कारण प्रत्यक्षात तीन वर्षांत मार्गी लावायच्या योजनेचे काम अत्यंत धीम्यागतीने होत असल्याने हे काम असेच सुरू राहिल्यास पुढील ५० वर्षांत ही योजना मार्गी लागणे कठीण असल्याचे मत तत्कालीन नगरसेवक नितीन वाळके यांनी सभागृहात नोंदविले होते. त्याचबरोबर या कामासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा ठरावही एकमताने सभागृहात घेण्यात आला होता; मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यां‍नी हा ठराव रद्द केला. त्यावरही माजी नगरसेवक वाळके यांनी पालिका सभागृहात या योजनेची पुढील जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांचीच राहील, असे स्पष्ट मत नोंदविले होते.
..................
भिजत घोंगडे
सांडपाणी निचऱ्याची शहरातील गंभीर समस्या पाहता भुयारी गटार योजना प्रथम दाट वस्ती असलेल्या बाजारपेठेत, तसेच अपार्टमेंट असलेल्या भागात राबविण्यात यावी, अशी सूचना तत्कालीन नगरसेवकांनी सभागृहात केली होती. कारण रेवतळे, वायरी, आडवणसह अन्य भागांतील नागरिकांची परडी (मोकळी जागा) मोठी असल्याने त्यांना सांडपाण्याचा प्रश्‍न एवढ्या मोठ्या प्रमाणात भेडसावत नव्हता. तसेच भरड भागातील वाघाचा मळा, भंडारी हायस्कूलचे गारडा या दोन मळ्यांच्या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारल्यास उपलब्ध होणाऱ्या शुद्ध पाण्यावर हे दोन मळे चांगले फुलण्यास मदत मिळेल, अशीही सूचना केली होती; मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी याला विरोध दर्शविला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात सुरुवातीस ही योजना कार्यान्वित केली असती, तर त्याचे चांगले परिणाम पाहता शहरातील अन्य भागांतही या योजनेचे काम टप्प्याटप्प्याने मार्गी लावणे शक्य झाले असते; मात्र याची कार्यवाही न झाल्याने या योजनेचे घोंगडे अद्यापही भिजतच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
...............
खर्च वाढला
भुयारी गटार योजनेचे काम रखडत चालल्याने ही योजना मार्गी केव्हा लागणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. यात सत्ताधारी, विरोधक यांच्यात सातत्याने पालिकांच्या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. योजनेसाठी सुरुवातीस १८ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला; मात्र त्यानंतरच्या काळात शासनाकडून योजनेच्या कामासाठी विविध टप्प्यांत कमी प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने या योजनेचे काम पुढे सरकत नव्हते. त्याच दरम्यान पूर्वी योजनेसाठी मंजूर झालेला निधी आणि त्यानंतर योजनेच्या साहित्यात बाजारभावाप्रमाणे वाढ झालेली पाहता या योजनेसाठी शासनाकडून आणखी निधी मंजूर करून घेणे महत्त्वाचे बनले. त्यामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचे याबाबत लक्ष वेधल्यानंतर त्यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे उर्वरित कामासाठी ६ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला. त्यामुळे ही योजना २५ कोटी ८१ लाख रुपयांवर पोहोचली.
.................
योजना पूर्ण होणार कधी?
भुयारी गटार योजनेचे २०१२ पासून सुरू असलेले काम अत्यंत धीम्या गतीनेच सुरू होते. त्यानंतर कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळात योजनेचे काम पूर्णतः ठप्प झाले. तीन वर्षांत पूर्ण करायची योजना गेल्या बारा वर्षांच्या काळात अद्यापही मार्गी न लागल्याने या योजनेचे भवितव्य काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. वाढते पर्यटन आणि सांडपाण्याची गंभीर होत असलेली समस्या याचा विचार करता ही योजना कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणे अत्यावश्यक बनले आहे.
..................
यंत्रसामग्री महागली
भुयारी गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारास आतापर्यंत सुमारे १७ कोटी ३६ लाख रुपयांचे बिल पालिकेकडून आदा केले आहे. त्याची दीड कोटींची अनामत रक्कम पालिकेकडे जमा आहे. या योजनेचे काम केवळ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी बसविल्या जाणाऱ्या मशिनरीमुळे अडकले आहे. या मशिनरीसाठी योजनेत ८० लाख रुपयांची तरतूद होती; मात्र आता प्रत्यक्षात या मशिनरीची किंमत दीड कोटींवर पोहोचली आहे. कोरोना संकटात कामे ठप्प राहिल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे या मशिनरीसाठी संबंधित ठेकेदाराकडे पैसे नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी केवळ आणि केवळ या मशिनरीमुळेच भुयारी गटार योजना कार्यान्वित झालेली नाही.
...............
योजनेत काय आहे?
* संपूर्ण शहरात ४३ किलोमीटरची पाईपलाईन
* आडारी येथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प
* देऊळवाडा सागरी महामार्ग, देऊळवाडा स्मशानभूमी, रेवतळे, मासळी मंडई येथे पपिंग स्टेशन
* सांडपाणी जोडणीसाठीचे १९७८ चेंबर
* शासनाचा हिस्सा वगळता मालवण पालिकेची ८ कोटी ३३ लाखांची गुंतवणूक
--------------
सद्यःस्थितीतील काम
* ४३ किलोमीटरपैकी ४१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण
* सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीचे काम पूर्ण
* देऊळवाडा स्मशानभूमी, रेवतळे, मासळी मंडई येथे विहिरींचे काम पूर्ण, तर पपिंग स्टेशनचे काम अपूर्ण
* मौनीनाथ मंदिर मेढा, दांडी मोरेश्‍वर येथील पपिंग स्टेशनचे ५० टक्के काम पूर्ण
* सागरी महामार्ग येथील विहिरीचे काम अपूर्ण
* सांडपाणी जोडणीच्या १९७८ चेंबरपैकी १५८७ चेंबरचे काम पूर्ण
* आडारीतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी मशिनरीचे काम अपूर्ण
* रेवतळे, बाजारपेठ येथील पाईपलाईन, चेंबरचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले; मात्र पपिंग स्टेशन नसल्याने ही योजना कार्यान्वित झाली नाही.
--------------
कोट
59174
भुयारी गटार योजनेचे काम तीन वर्षांत मार्गी लावणे गरजेचे होते; मात्र योजनेतील त्रुटी, बदललेले डिझाईन यामुळे ही योजना विलंबाने सुरू झाली. शासनाकडून आवश्यक निधी न आल्याने योजनेचे काम धीम्या गतीने सुरू राहिले. योजनेच्या ठेकेदारास मुदतवाढ दिल्यानंतर आतापर्यंत ४१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरचे काम शिल्लक आहे. संबंधित ठेकेदारास डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदतवाढ दिली होती; मात्र अद्यापही काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदारावर आता दंडात्मक कारवाई होणार आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी मशिनरीसाठी दीड कोटींची आवश्यकता आहे. ही रक्कम पालिकेने प्रथम द्यावी, अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केली आहे; मात्र ही रक्कम पालिका प्रशासन देऊ शकत नाही. केवळ या मशिनरीमुळे ही योजना कार्यान्वित झाली नाही. ही मशिनरी उपलब्ध झाल्यास तीन महिन्यांत ही योजना कार्यान्वित करता येईल.
- सुधाकर पाटकर, आवेक्षक, पालिका
..............
कोट
59175
भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी पालिकेवर कर्ज काढण्याची नामुष्की ओढवणार होती; मात्र उर्वरित निधीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे या योजनेसाठी वाढीव निधी मिळाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली; मात्र कोविड काळात कामगारांअभावी योजनेचे काम ठप्प राहिले. परिणामी ही योजना आमच्या कारकीर्दीत पूर्ण होऊ शकली नाही. आता केवळ दोन किलोमीटरचे काम आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी दीड कोटी रुपयांची मशिनरी हे काम शिल्लक राहिले. बाजारपेठ भागात ही योजना प्राधान्याने व्हावी, यासाठी प्रयत्न होते; मात्र ते होऊ शकले नाही. आज पालिकेवर प्रशासक बसून वर्षभराचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवे होते. राजकारण बाजूला ठेवून मालवणच्या हितासाठी ही योजना पूर्ण करणे गरजेचे आहे.
- महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष
.................
कोट
59177
ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘भुयारी गटार’चे काम रखडले. प्रत्यक्षात ही योजना २०१२ मध्येच पूर्ण होणे गरजेचे होते. आता वाढते पर्यटन आणि सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने या योजनेचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे. सांडपाण्याच्या गंभीर समस्येमुळेच येथे थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलची उभारणी होत नसल्याचे दिसून आले आहे. योजनेच्या कामासाठी आवश्यक मशिनरीसाठी ठेकेदाराकडे पैसेच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे संबंधिताचा ठेका काढून घेऊन नवीन ठेकेदाराकडून किंवा शासनाने आपल्या सक्षम यंत्रणेमार्फत हे काम पूर्ण करणे किंवा पालिकेस मशिनरी खरेदी करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. तरच ही योजना कार्यान्वित होईल; अन्यथा या योजनेचे घोंगडे भिजतच राहील.
- नितीन वाळके, माजी नगरसेवक
...................
कोट
59176
पालिकेची भुयारी गटार योजना काही वर्षांपूर्वीच मार्गी लागणे आवश्यक होते. आज सांडपाण्याच्या गंभीर समस्येला आमच्यासारख्या हॉटेल व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे. या योजनेत शासनाचे आणि जनतेच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेची गुंतवणूक करण्यात आली आहे. योजना मार्गी न लागण्यास तत्कालीन सत्ताधारी, प्रशासकीय अधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. त्यामुळे शासनाने या सर्वांकडून झालेल्या खर्चाची वसुली करायला हवी. शहरातील वाढते पर्यटन आणि भविष्याचा विचार करता शासनाने ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत."
- भाऊ सामंत, हॉटेल व्यावसायिक
...................
कोट
59179
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल ठरला आहे. पर्यटनाच्या जागतिक नकाशावर मालवण शहर अग्रभागी असताना शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, उघडी गटारे यामुळे शहर आज बकाल अवस्थेत आहे. भुयारी गटार योजनेचे महत्त्व जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना नसल्याने अज्ञानामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. गेली १२ वर्षे योजनेचे काम सुरू असून दरवर्षी पावसाळ्यात या योजनेच्या चेंबरमधून पाणी झाकणातून बाहेर रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्याला खड्डे पडत आहेत. स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश उघड्यावरील शौचविधी बंद करणे, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्ती, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयीमध्ये बदल आदी प्रश्न निकाली लागले असते. भुयारी गटार योजनेच्या अपयशाची त्यावेळच्या व आताच्या आमदार व नगरसेवकांना लाज वाटत नाही का?
- अमित इब्रामपूरकर, नागरिक
......................
कोट
59178
राजकीय अनास्थेमुळेच भुयारी गटार योजनेचे काम रखडले. संबंधित ठेकेदाराची वाढीव कामाची साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी ठेकेदाराने करत त्यातून मशिनरी आणणार असल्याचे सभागृहात येऊन सांगितले होते; मात्र ठेकेदाराने मशिनरी आणली नाही. शहरातील वाढते पर्यटन, सांडपाण्याची समस्या आणि नागरिकांचे आरोग्य याचा विचार करता ही योजना होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट होऊन शिल्लक कामाची नव्या दरानुसार पुन्हा निविदा काढून हे काम करायला हवे.
- गणेश कुशे, माजी गटनेता, पालिका