यंदा फटाक्यांमुळे कमी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा फटाक्यांमुळे कमी जखमी
यंदा फटाक्यांमुळे कमी जखमी

यंदा फटाक्यांमुळे कमी जखमी

sakal_logo
By

यंदा फटाक्यांमुळे कमी जखमी
मुंबई, ता.२९ ः मुंबईत यंदा फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. लहान मुलांसह थोरा-मोठ्यांनीही मोठमोठे फटाके फोडले. दरम्यान काही लहान मुले जखमी झाल्याची नोंद पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये करण्यात आली. मात्र, यंदा फटाक्यांमुळे गंभीर जखमी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञांनी दिली.
पालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातील नेत्ररोग विभागात आतापर्यंत दहा ते बारा रुग्णांची फटाक्यांनी भाजल्यामुळे नोंद करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात दिवाळीत गंभीर भाजलेली दोन लहान मुले दाखल झाली होती. त्यांपैकी एका १२ वर्षीय मुलीवर अजूनही बर्न्स वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा, छाती आणि दोन्ही हात भाजले आहेत. तिच्या डोळ्यांवरही उपचार केले जात आहेत. मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती सायन रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
जे. जे. रुग्णालयात दिवाळीपूर्वीपासून फटाक्यांच्या दाहामुळे जखमी झालेली लहान मुले दाखल व्हायला सुरुवात झाली होती. भाऊबीजेपर्यंत मुले दाखल होत होती. जे. जे. रुग्णालयात चार लहान मुलांवर उपचार करण्यात आले. एका २४ वर्षीय तरुणावर फटाक्यांच्या दाहामुळे डोळा थोडक्यात बचावला. दोन दिवसांपूर्वी वडाळ्यातील एका पाच वर्षांच्या मुलाला बुबुळावर जखम झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर योग्य उपचार झाले. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी आलेल्या एका छोट्या मुलीला किरकोळ जखम झाली होती. चौथ्या रुग्णाच्या चेहऱ्यावर भाजले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी विभागाअंतर्गत उपचार सुरू आहेत. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नियावर छोट्या जखमा झाल्या आहेत. त्याची दृष्टी वाचल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रागिनी पारेख यांनी दिली.