Kokan तेरवण मेढेत होणार नवा पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
तेरवण मेढेत होणार नवा पूल

Kokan : तेरवण मेढेत होणार नवा पूल

साटेली भेडशी : दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील तेरवण मेढे येथील धोकादायक पुलाच्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या धोकादायक पुलाच्या खालच्या बाजूने सिमेंट पाईप टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. साहजिकच, नव्या पुलाच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे.

तेरवण मेढे ग्रामपंचायत आणि श्री देव नागनाथ मंदिर प्रवेशद्वारादरम्यान तो पूल आहे. पुलाचा एका बाजूचा भराव आणि खांब ढासळल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक होते. त्यामुळे पुलावरून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली होती. दरम्यान, बांधकामच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तो पूल कमकुवत आणि वाहतुकीस अयोग्य असल्याचे उघड झाले. सद्यस्थितीत त्या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर खासगी आणि अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर वित्त व नियोजन मंत्री असताना त्यांनी खासगी असलेला तिलारी घाट सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केला. घाटरस्त्याच्या रुंदी व मजबुतीकरणासाठी निधी दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. अशा स्थितीत धोकादायक पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरू शकला असता. त्याचा विचार करून त्या पुलाच्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सध्या पर्यायी रस्ता बनविण्यात येत आहे. लवकरच नवा पूल बांधण्याचे काम सुरू होणार असून तोपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.

स्थानिकांकडून समाधान व्यक्त

दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील तेरवण मेढे येथील धोकादायक पुलाच्या जागी नवा पूल बांधण्यात येणार असल्याने आता स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कारण याआधीचा पूल वाहतुकीस धोकादायक ठरला होता. ही बाब स्थानिकांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. एकूणच, ही समस्या सुटणार असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.