देवगडमध्ये भातकापणी आली अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये भातकापणी 
आली अंतिम टप्प्यात
देवगडमध्ये भातकापणी आली अंतिम टप्प्यात

देवगडमध्ये भातकापणी आली अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

देवगडमध्ये भातकापणी
आली अंतिम टप्प्यात

आंबा हंगामासाठी व्यावसायिक सज्ज

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः बरेच दिवस रेंगाळलेल्या परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील भातकापणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कडक उनामुळे कापलेले गवत सुकण्यास मदत होत आहे. भात कापणी उरकत आल्याने आता गुरे राखण्याचे कामही कमी होणार आहे. दरम्यान, थंडीची चाहूल लागल्याने नव्या आंबा हंगामाच्या दृष्टीने व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
मध्यंतरी परतीच्या पावसाने विजांच्या लखलखाटासह धुमाकूळ घातल्याने भातकापणीमध्ये व्यत्यय आला होता. आता भातकापणी अंतिम टप्यात आली आहे. दिवाळी सणानंतर आता भातकापणीने वेग घेतला असून येत्या चार दिवसांत कापणी पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सध्या ऊन पडत असल्याने झोडणी करून झालेले गवत वाळविण्यासाठी सोयीचे होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीमुळे गुरांची राखण करावी लागते; मात्र आता कापणी पूर्ण होत आल्याने मळे रिकामे झाले आहेत. पर्यायाने गुरांची राखण करण्याचे काम कमी होणार आहे. पाण्याची सोय असलेले काही शेतकरी हिवाळी शेती करतात. हिवाळी शेतीला लवकरच सुरुवात होईल. या काळात भाजीपाला उत्पादन, भुईमूग, कुळीथ, उडीद यासह कडधान्ये पिके घेतली जातात. आता थंडी जाणवू लागली असल्याने आगामी आंबा हंगामाच्या दृष्टीने बागायतदारांचे नियोजन सुरू होणार आहे. त्यामुळे किटकनाशके, संजीवके विक्रेते सज्ज झाले आहेत. आंबा कलमांना मोहोर येण्यास अनुकुल वातावरण असल्याने बागायतदारांबरोबरच विक्रेत्यांमध्ये उत्साह आहे.