Chiplun शिंदे गटात कोण आणि ठाकरे गटात कोण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun
चिपळूण - शिंदे गटात कोण आणि ठाकरे गटात कोण

Chiplun : शिंदे गटात कोण आणि ठाकरे गटात कोण

चिपळूण : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटात कोण आणि ठाकरे गटात कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सावध भूमिकेचे चिलखत वापरून भल्या-भल्या इच्छुकांनी आता आपल्या तलवारही म्यान केल्याचे चित्र आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात निवडणुकांच्या लहरी हवामानानुसार पुन्हा एकदा शांतता पसरली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जान आणायची झाल्यास निवडणुका तितक्याच गरजेच्या आहेत. करपलेली भाकरी बदलण्यासाठी निवडणुकांकडे एकमेव संधी म्हणून पाहिली जाते. कोरोनामुळे सुरू झालेल्या निवडणुकांच्या गोंधळात आता राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांचा भर पडत आहे. परिणामी कार्यकर्त्यांत उत्साह आणणाऱ्या निवडणुकांचा फड ‘तारीख पे तारीख’मध्येच अडकला आहे.

२०११ च्या लोकसंख्येनुसारच सदस्य संख्या निश्‍चितीच्या सरकारच्या निर्णयाने चिपळूणची लोकसंख्या ५५ हजार १३९ असणार आहे. त्यामुळे पुन्हा यंत्रणेला प्रभाग रचना, आरक्षणाचे पारायण पूर्ण करावे लागेल. शहरात यापूर्वी १३ प्रभाग आणि २६ सदस्य संख्या होती. एक प्रभाग वाढल्याने आता १४ प्रभागातून २८ सदस्य निवडून येणार आहेत. पूर्वीच्या आरक्षणानुसार इच्छुकांची तयारी जोमाने सुरू होती. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. मतदार यादीची पाहणी करून गणिते मांडली जात होती.

कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल वाढली. आरोप- प्रत्यारोपांचा फड रंगत होता, मात्र प्रभागरचनेसह आरक्षण बदल होणार असल्याने इच्छुकांनी तलवारी म्यान केल्यात. आपल्या सर्व हालचाली इच्छुकांनी सावध भूमिकेतून सुरू केल्यात. इच्छुकांच्या सोयीचे आरक्षण पडल्याने त्यांच्यात जान आली होती, मात्र आता त्यांच्यात तीच जान शोधावी लागत आहे. राजकीय पक्षांतील हालचालीही थंड झाल्या आहेत.

नेता कोणाचा, कार्यकर्ता कोणाचा

चिपळूणच्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. सद्यस्थिती माजी आमदार सदानंद चव्हाण वगळता सर्वच प्रमुख नेते ठाकरे गटात आहेत, मात्र प्रत्येक नेता त्यांच्यातील वेगळ्या गटात विखुरला गेला आहे. कोणता कार्यकर्ता कोणत्या नेत्याचा, आपण निवडणुकीला उभे राहिलो तर आपल्याला कुणाची मदत मिळेल, हेच उमेदवारांना समजत नाही. त्यामुळे सेनेच्या इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.

म्हणून हातही आखडता

नियोजनानुसार निवडणुका झाल्या असत्या तर दिवाळीच्या निमित्ताने फराळचे कार्यक्रम झाले असते. इच्छुकांना उटणेही वाटले असते. कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी त्यांची घरी जाऊन फराळ करणे, मिठाई पाठण्याचे कार्यक्रम झाले असते, परंतु भविष्यातील फेर प्रभागरचना, आरक्षणाच्या गोंधळात कोठे लढायचे, हेच निश्‍चित नसल्याने इच्छुकांनी दिवाळीच्या निमित्ताने खर्च आणि देणगीसाठीही हात आखडता घेतला आहे.