संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

59368
मालवण ः निवड चाचणीचा प्रारंभ करताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर.

मालवणमधील चाचणीत
३२ क्रिकेटपटूंची निवड
मालवण : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे अणि सिंधुदुर्ग जिल्हा किक्रेट असोसिएशनतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे आज घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन बाळ चोडणकर उपस्थित होते. मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने नंदन देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी निवड समिती सदस्य पप्पू परब, नंदू रेडकर, उमेश मांजरेकर यांनी मुलांची मैदानावरील कामगिरी पाहून ३२ मुलांची प्राथमिक निवड केली. आज घेण्यात आलेल्या या निवड चाचणीत १४ वर्षांखालील ५७ मुलांनी सहभाग घेतला.
---
मठमध्ये ‘दीपावली शो टाईम’
वेंगुर्ले ः संत लालाजी भक्तमंडळ मठ-टाकयेवाडीतर्फे २ व ३ नोव्हेंबरला ‘दीपावली शो टाईम’चे आयोजन केले आहे. यामध्ये तालुका व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत होणार आहेत. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स मोठा गट (१३ वर्षांपुढील)-अनुक्रमे १५००, १०००, ७०० व उत्तेजनार्थ ५०० रुपये व प्रमाणपत्र, लहान गट (पहिली ते सातवी)-१०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ ३०० रुपये व प्रमाणपत्र, तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स- (लहान गट, पहिली ते सातवी)-अनुक्रमे ५००, ३००, २०० व उत्तेजनार्थ १०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धा बुधवारी (ता. २) सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संत लालाजी मंदिरात होणार आहेत. बक्षीस वितरण गुरुवारी (ता.३) सायंकाळी सहाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दशावतार नाटक होणार आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सहभागासाठी मंगळवारपर्यंत (ता. १) नावनोंदणी करावी.
--
केळूसला ३ पासून विविध कार्यक्रम
कुडाळ ः केळूस-बापडतेवाडी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दररोज सकाळी सहाला महापूजा, दुपारी तीनला हरिपाठ, सायंकाळी चारला आळंदी-पुणे येथील महंतांची प्रवचने, पाचला वारकरी भजने, आरती, पुराण, पालखी होणार आहे. गुरुवारी (ता.३) रात्री सव्वादहाला राष्ट्रीय कीर्तनकार संदीप मांडके यांचे ‘अहिल्योद्धार’ कीर्तन, शुक्रवारी (ता.४) संदीप मांडके यांचे ‘संत तुकाराम’ कीर्तन, शनिवारी (ता.५) सदाशिव पाटील यांचे ‘संत गोमाई’ कीर्तन, रविवारी (ता.६) चिन्मय देशपांडे यांचे ‘विजयी पांडुरंग’ कीर्तन, सोमवारी (ता. ७) दुपारी सव्वाबाराला महाप्रसाद, तीनला गायन, सायंकाळी पाचला ‘गोफ’, सहाला फुगडी, रात्री दहाला दिंडी, दोनला मकरंद देसाई यांचे ‘राधा गर्व परिहार’ कीर्तन होईल.
.................
आरवलीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
वेंगुर्ले ः आरवली येथील श्री सरस्वती विद्यालयात उत्कर्षा उपक्रमांतर्गत ''मासिक पाळी व्यवस्थापन व सुरक्षितता'' या विषयावर मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे पदाधिकारी भालचंद्र दीक्षित तसेच सदस्या स्मिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. गायकवाड यांनी मुलींना सॅनिटरी पॅड, टॅबलेटस् तसेच मासिक पाळी सुरक्षितता या विषयांवर मार्गदर्शन करून त्यावर आधारित मार्गदर्शक पुस्तकांचे वितरण केले. तसेच ''गुड टच'' व ''बॅड टच'' याविषयी माहिती सांगण्यात आली. दीक्षित यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक एम. एल. जाधव यांनी केले. एस. एस. नाईक यांनी सूत्रसंचालन केले. खान यांनी आभार मानले.

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मुद्राळे
मालवण : श्रावण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते माजी सैनिक सुधाकर उर्फ बाळा आत्माराम मुद्राळे यांची निवड करण्यात आली. मुद्राळे हे शांत स्वभावाचे व हुशार असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कशाप्रमाणे शांत करायचे याचा पूर्ण अनुभव आहे. सैनिक म्हणून सेवा बजावताना अनेक राज्ये फिरून त्यांनी विविध भाषा अवगत केल्या आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी कसे वागायचे, त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या, याचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यांची ही कारकीर्द यशस्वी होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मुद्राळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रावण ग्रामसभेमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रोहित नाईक यांचा प्रामाणिकपणा
दोडामार्ग ः मणेरी येथील रोहित नाईक यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर पाकीट मिळाले. ते त्यांनी येथील पोलिस ठाण्यात दिले. पोलिसांनी ते पाकिट मूळ मालकाकडे सुपूर्द केले. नाईक यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक आहे. गोवा-हणखणे येथील गोपीनाथ नाईक यांचे पाकीट सासोली-दोडामार्ग प्रवासादरम्यान शुक्रवारी सकाळी हरवले होते. त्यात महत्त्वाची कागदपत्रे व काही रक्कम होती. रोहित नाईक यांना प्रवासादरम्यान बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावरील कुडासे तिठा येथे ते पाकीट मिळाले. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पाकीट येथील पोलिस ठाण्यात जमा केले. त्यानंतर पोलिसांनी मूळ मालक गोपिनाथ नाईक यांना संपर्क केला व हरवलेले पाकीट सुपूर्द केले.
--
पोलिसांची कार्यतत्परता
वेंगुर्ले ः आरवली येथे तीन दिवसांपूर्वी रस्त्यात गहाळ झालेला एका रशियन महिला पर्यटकाचा मोबाईल शनिवारी शिरोडा पोलिसांनी संबंधित पर्यटक महिलेकडे सुपूर्द केला. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. २५ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास रशियन महिला पर्यटकाचा मोबाईल आरवली येथे मुख्य रस्त्यावर गहाळ झाला होता. तो मोबाईल रेडी-हुडावाडी येथील आरोग्य सेवक विकास आजगावकर यांना सापडला होता. तो मोबाईल त्यांनी पोलिस ठाण्यात जमा केला होता. शिरोडा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. दळवी, पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी योग्य ती चौकशी करुन शनिवारी शिरोडा-वेळागर येथे आलेल्या संबंधित पर्यटकाकडे मोबाईल सुपूर्द केला.
--
मागवणेवाडी पूल धोकादायक
मालवण ः मसुरे-मागवणेवाडी येथील रमा नदीवर जीर्ण झालेले पुलाचे साईड पोल लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक रमेश चव्हाण यांनी केली आहे. या पुलाचे बांधकाम झाल्यावर अनेक वर्षे झाली; परंतु या पुलाकडे प्रशासनाने किंवा बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पुलाच्या कडेला लोखंडी पोल उभारून संरक्षण कठडा तयार केला होता. आता हे लोखंडी पोल गंजून पाईप गायब झाले आहेत. गुरेढोरे व विद्यार्थी या पुलावरून ये-जा करत असतात. त्यामुळे पुलाला तत्काळ संरक्षक पाईप बसविण्याची मागणी केली आहे.
--
पोलिसांतर्फे मिठाई वाटप
ओरोस ः सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आनंदाश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी सणानिमित्त मिठाईचे वाटप केले. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत देवरे आणि सहकाऱ्यांनी या वृद्धाश्रमाला भेट देत मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांनी वृद्धांशी संवादही साधला. देवरे यांच्यासह उपनिरीक्षक जे. आर. वारा, मणचेकर आदी यावेळी उपस्थित होते. आनंदाश्रयाचे प्रमुख बबन परब यांच्याकडे मिठाई सुपुर्द करण्यात आली.
--
दिव्यांगांना संघटनेचे आवाहन
मालवण : येथील पालिकेकडे दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव केला आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांग बांधवांनी १० नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करायचे आहेत. हे हयात दाखले मालवण भरड नाका येथील वायुसुत कम्युनिकेशन सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी दिली आहे.