संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

संक्षिप्त
मागवणेवाडी पूल धोकादायक
मालवण ः मसुरे-मागवणेवाडी येथील रमा नदीवर जीर्ण झालेले पुलाचे साईड पोल लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक रमेश चव्हाण यांनी केली आहे. या पुलाचे बांधकाम झाल्यावर अनेक वर्षे झाली; परंतु या पुलाकडे प्रशासनाने किंवा बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पुलाच्या कडेला लोखंडी पोल उभारून संरक्षण कठडा तयार केला होता. आता हे लोखंडी पोल गंजून पाईप गायब झाले आहेत. गुरेढोरे व विद्यार्थी या पुलावरून ये-जा करत असतात. त्यामुळे पुलाला तत्काळ संरक्षक पाईप बसविण्याची मागणी केली आहे.

आरवलीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
वेंगुर्ले ः आरवली येथील श्री सरस्वती विद्यालयात उत्कर्षा उपक्रमांतर्गत ''मासिक पाळी व्यवस्थापन व सुरक्षितता'' या विषयावर मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे पदाधिकारी भालचंद्र दीक्षित तसेच सदस्या स्मिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. गायकवाड यांनी मुलींना सॅनिटरी पॅड, टॅबलेटस् तसेच मासिक पाळी सुरक्षितता या विषयांवर मार्गदर्शन करून त्यावर आधारित मार्गदर्शक पुस्तकांचे वितरण केले. तसेच ''गुड टच'' व ''बॅड टच'' याविषयी माहिती सांगण्यात आली. दीक्षित यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक एम. एल. जाधव यांनी केले. एस. एस. नाईक यांनी सूत्रसंचालन केले. खान यांनी आभार मानले.

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मुद्राळे
मालवण : श्रावण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते माजी सैनिक सुधाकर उर्फ बाळा आत्माराम मुद्राळे यांची निवड करण्यात आली. मुद्राळे हे शांत स्वभावाचे व हुशार असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कशाप्रमाणे शांत करायचे याचा पूर्ण अनुभव आहे. सैनिक म्हणून सेवा बजावताना अनेक राज्ये फिरून त्यांनी विविध भाषा अवगत केल्या आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी कसे वागायचे, त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या, याचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यांची ही कारकीर्द यशस्वी होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मुद्राळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रावण ग्रामसभेमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रोहित नाईक यांचा प्रामाणिकपणा
दोडामार्ग ः मणेरी येथील रोहित नाईक यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर पाकीट मिळाले. ते त्यांनी येथील पोलिस ठाण्यात दिले. पोलिसांनी ते पाकिट मूळ मालकाकडे सुपूर्द केले. नाईक यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक आहे. गोवा-हणखणे येथील गोपीनाथ नाईक यांचे पाकीट सासोली-दोडामार्ग प्रवासादरम्यान शुक्रवारी सकाळी हरवले होते. त्यात महत्त्वाची कागदपत्रे व काही रक्कम होती. रोहित नाईक यांना प्रवासादरम्यान बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावरील कुडासे तिठा येथे ते पाकीट मिळाले. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पाकीट येथील पोलिस ठाण्यात जमा केले. त्यानंतर पोलिसांनी मूळ मालक गोपिनाथ नाईक यांना संपर्क केला व हरवलेले पाकीट सुपूर्द केले.

पोलिसांची कार्यतत्परता
वेंगुर्ले ः आरवली येथे तीन दिवसांपूर्वी रस्त्यात गहाळ झालेला एका रशियन महिला पर्यटकाचा मोबाईल शनिवारी शिरोडा पोलिसांनी संबंधित पर्यटक महिलेकडे सुपूर्द केला. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. २५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ च्या सुमारास रशियन महिला पर्यटकाचा मोबाईल आरवली येथे मुख्य रस्त्यावर गहाळ झाला होता. तो मोबाईल रेडी-हुडावाडी येथील आरोग्य सेवक विकास आजगावकर यांना सापडला होता. तो मोबाईल त्यांनी पोलिस ठाण्यात जमा केला होता. शिरोडा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. दळवी, पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी योग्य ती चौकशी करुन शनिवारी शिरोडा-वेळागर येथे आलेल्या संबंधित पर्यटकाकडे मोबाईल सुपूर्द केला.