पान एक-कोळपेतील जुगार अड्डयावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-कोळपेतील जुगार अड्डयावर छापा
पान एक-कोळपेतील जुगार अड्डयावर छापा

पान एक-कोळपेतील जुगार अड्डयावर छापा

sakal_logo
By

पान एक


कोळपेतील जुगार अड्ड्यावर छापा
११ जण ताब्यात; वैभववाडी पोलिसांत गुन्हा; रोकड, साहित्य जप्त
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः कोळपे येथे राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे कोळपे परिसरात खळबळ माजली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कादिर इब्राहीम थोडगे (वय ५०), हुसेन उमर लांजेकर (४१), नासीर कमरूद्दीन नंदकर (५३), युसूफ फकीर नंदकर (४५), खुदबुद्दीन महंमद नंदकर (३६), अल्ताफ शब्बीर नंदकर (२४), हुसेन धोंडू नंदकर (४६), रमजान सरदार नाचरेकर (३०), दाऊद हसन नाचरेकर (५० सर्व रा. कोळपे जमातवाडी), खुदबुद्दीन इब्राहीम पाटणकर (रा. उंबर्डे मेहबूबनगर) यांचा समावेश आहे.
कोळपे-जमातवाडी येथे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलिस शिपाई कृष्णांत पडवळ, अजय बिलपे, कुंडलिक वानोळे, अमोल जाधव कोळपे-जमातवाडी येथे पोहोचले. जमातवाडी येथील एका सागाच्या झाडाखाली व्हाळाशेजारी काही लोक जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. जुगार खेळण्यासाठी असलेले साहित्य आणि २ हजार ९०० रुपयेही पोलिसांनी ताब्यात घेत सर्वांना वैभववाडी पोलिस स्थानकात आणले. अचानक छापा टाकल्यामुळे तेथील काही लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


राजकीय पदाधिकारी पोलिसांत
कोळपे-जमातवाडी आणि उंबर्डे-मेहबूबनगर येथील एक अशा अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वैभववाडीला आणल्याची माहिती अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र पसरली. ही माहिती काही राजकीय पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी मध्यस्थीसाठी प्रयत्न सुरू केले. संबंधित पक्षाचे पदाधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस स्थानकात ठाण मांडून होते.

त्यांना हे शोभते का?
भाजप आणि काँग्रेस हे दोनही राष्ट्रीय पक्ष असून, दोनही पक्षांची एक विचारधारा आहे. दारू, मटका, जुगार किंवा यांसारख्या गुन्ह्यांतील संशयितांच्या सुटकेसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते, परंतु राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारे मध्यस्थी करणे शोभते का, अशा संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.