पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरवाढीचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरवाढीचा विक्रम
पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरवाढीचा विक्रम

पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरवाढीचा विक्रम

sakal_logo
By

01381

पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरवाढीचा विक्रम
कणकवली, ता. ३० ः पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा सर्वाधिक फटका दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याला बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चढेच असून दिवाळीनंतर घाऊक बाजारातच भाज्या १०० ते १२० रुपये किलो विकल्या जात आहेत. परिणामी, किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर किलोमागे १२० ते २०० रुपयांपर्यंत गेले असून बाजाराच्या इतिहासातील हा उच्चांक आहे.
दिवाळीपर्यंत अधूनमधून पडणाऱ्या पावसाने बरीच पिके पाण्यात गेली. त्यामुळे सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. दिवाळीत तरी दर कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही पावसाने दाणादाण उडवल्याने हातातोंडाशी आलेल्या भाजीपाल्यावर पाणी पडले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. दररोजची ६०० ते ६५० गाड्यांची आवक केवळ ४०० गाड्यांवर आली आहे. त्यातही केवळ २० टक्के माल उत्तम दर्जाचा असून, उर्वरित ८० टक्के भाजीपाला भिजलेला, सुकलेला आहे. त्यामुळे जो काही चांगला भाजीपाला बाजारात येत आहे, त्याला मोठी मागणी आहे. परिणामी, दरातही वाढ झालेली दिसत आहे. घाऊक बाजारातच भाज्या ८० ते १००, अगदी १२० रुपये किलोवर आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर १५० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत.
--
मजूर मिळत नसल्यामुळे गैरसोय
किरकोळ बाजारात मटार आणि शेवगा २०० रुपये किलो झाला आहे. आत्तापर्यंत त्यांचे दर १०० ते १२० रुपये किलो होते. मात्र या वेळी त्यांनी उच्चांक गाठला आहे. दिवाळीच्या काळात शेतात कामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे भाजीपाला शेतातून काढून त्याचे पॅकिंग करून तो बाजारात पाठवायलाही मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बाजारात भाजीपाला येणे कठीण होते. त्यात आता तर शेतात भाजीपालाही कमी आहे. त्यामुळे बाजारात भाज्याच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे.