पोह्याच्या गिरण्यांना उतरती कळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोह्याच्या गिरण्यांना उतरती कळा
पोह्याच्या गिरण्यांना उतरती कळा

पोह्याच्या गिरण्यांना उतरती कळा

sakal_logo
By

59468
सावंतवाडी ः शहरात असलेली साटेलकर बंधूंची पोहे गिरण. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


पोह्याच्या गिरण्यांना उतरती कळा

व्यवसायाचा ट्रेंड बदलला; तयार पोह्यांना पसंती

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः दिवाळी सणामध्ये रोजगार मिळवून देणारे पोहे गिरणी आताच्या काळात ओस पडल्या आहेत. गावठी पोह्यांपेक्षा आता बाजारी पोह्यांना वाढती मागणी असल्याने आणि कुठलेही कष्ट न घेता ते बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने पोहे गिरण्यांना उतरती कळा आली आहे. मागील पाच वर्षांपासून हा व्यवसाय हळूहळू कमी होत चालला असल्याचे मत काही व्यवसायिकांनी व्यक्त केले.
जग आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असताना कोकणातील काही जुन्या पद्धती हळूहळू लोप पावत आहेत. एकीकडे दळणवळणाची वाढलेली साधने, कमी जास्त प्रमाणात हाती आलेला पैसा या सर्व गोष्टी याला कारणीभूत आहेत. एकूणच कष्ट आणि मेहनत बाजूला सारत सहज मिळणाऱ्या गोष्टीला लोक आज कवटाळत आहेत. कोकणातील दिवाळी सण म्हटला की, प्रत्येकाच्या घरात पहाटे मिळणारा गोड पदार्थ म्हणजे गावठी पोहे. शेतात पिकवलेल्या भातापासून बनवलेले हे पोहे. या पोह्यांची चव बाजारात मिळणाऱ्या पोह्यात कधीच येणार नाही. परंतु, असे असले तरी गावठी पोहे तयार करण्यासाठी लागणारी मेहनत पाहता आज प्रत्येकाच्या घरात बाजारातूनच पोहे आणले जातात. त्यामुळे दिवाळी सणात पोहे बनवण्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या हक्काच्या रोजगाराला आज जिल्ह्यातील पोहे गिरण मालक मुकले आहेत. पूर्वीच्या तुलनेत आज पोहे गिरणीवर हवी तशी गर्दी पाहायला मिळत नसल्याने या गिरणी ओस दिसून येत आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांकडून पोहे कांडप करण्यासाठी आधी पंधरा दिवस लगबग दिसून येत असे. यासाठी शेतात पिकलेले नवीन भात कापून आणून ते रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी पहाटे पोहे गिरण्यावर घेऊन जाण्याची तळमळ काही वेगळीच होती. दिवसभर गिरणीवर थांबून घरी पोहे आणल्यानंतर घरातील मुलाबाळांच्या चेहर्‍यावरील आनंदही काही वेगळाच असायचा. त्यावेळी मुंबई पुण्यातील पै पाहुण्यांना गावठी पोहे पाठवून देण्याची पद्धतही होती. मात्र, आता हे चित्र पाहायला मिळत नाही.
सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या साटेलवकर गिरणीमध्ये नवरात्र सणापासून पोहे कांडप करण्यासाठी मोठी लगबग दिसून येत असे. दिवस-रात्र कामगारांच्या मदतीने या ठिकाणी पोहे कांडप केले जात असत. दिवाळी सणात तर येथे पोहे कांडप करण्यासाठी झुंबड उडायची. आठ-आठ दिवस पोहे कांडप करुन मिळत नसे. एवढी गर्दी त्यावेळी असायची. त्यावेळी पई आणि साटेलकर या दोन गिरणी शहरात होत्या. त्यात आता साटेलकर यांचीच गिरण आजही चालू आहे. तालुक्याचा विचार करता अनेक गिरणी याठिकाणी आहेत. यात मळगाव, बांदा, आरोस, सांगेली आदी ठिकाणी अशा गिरणी आहेत. मात्र, साटेलकर यांच्या गिरणीवर जिल्हाभरातून शेतकरी वर्ग पोहे कांडप करण्यासाठी गर्दी करत असत. पहाटे पहाटे या ठिकाणी भात घेऊन शेतकरी वर्ग हजर राहत असे. मात्र, आज बाजारात मिळणाऱ्या पोह्यांमुळे ही गर्दी कमी झाली आहे.
--------------
चौकट
गिरणी भविष्यात टिकतील का?
मागील दोन वर्षाचा विचार करता पोहे गिरणी भविष्यात टिकतील का? हा प्रश्नही या व्यावसायिकांसमोर आहे. बाजारात मिळणारे पोहे आणि गावठी पोहे यांची तुलना केल्यास आजही गावठी पोह्यांना मोठी किंमत आहे. परंतु, त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत करण्यास शेतकरी वर्ग दुर्लक्ष करत आहेत. गावठी पोहे आरोग्यासाठीही लाभदायक असल्याने बाजारात आजही त्यांना मागणी आहे.
--------------
कोट
बाजारात मिळणाऱ्या पोह्यांमुळे आज गावठी पोहे कांडप करण्यासाठी शेतकरी कष्ट घेत नाही. काही जुनी जाणती लोक आजही गावठी पोहे कांडप करतात. आम्ही दरवर्षी बेळगाव येथून कामगार आणून हा व्यवसाय करत होतो. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी फिरवलेला पाठ लक्षात घेता कामगार बोलावले नाही. जवळपास पाच वर्षापासून हा व्यवसाय कमी होत चालला आहे. आज ८० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- जयराम साटेलकर, गिरण व्यवसायिक, सावंतवाडी
------------------
कोट
आज बाजारात सगळ्याच वस्तू रेडीमेड मिळत आहे. गावठी पोह्यांना चव आणि मागणी असली तरी ते बनविण्यासाठी लागणारे कष्ट व वेळ लक्षात घेता बाजारात मिळणारे पोह्ये परवडतात. गेल्या पाच सहा वर्षात आम्ही बाराजातील पोहेच आणून दिवाळी साजरी करतो.
- महेश नाईक, शेतकरी