ग्रामीण साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण साहित्य संमेलन
ग्रामीण साहित्य संमेलन

ग्रामीण साहित्य संमेलन

sakal_logo
By

साहित्य सदर

swt3122.jpg
L59530
वृंदा कांबळी

लीड
ग्रामीण साहित्य संमेलन
दिवाळी झाली की थोड्याच दिवसांत तुलसी विवाहांची गडबड चालते. त्यानंतर लग्नांचे मुहूर्त असतात. ते होतात तोच विविध पातळ्यांवर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्याच दरम्यान शाळाशाळांमधून क्रीडा महोत्सव, पारितोषिक वितरण, गॅदरींग अशा कार्यक्रमांची धामधूम सुरू असते. अशावेळी ठिकठिकाणी साहित्य मेळावे, साहित्य संमेलने घेतली जातात. बोचऱ्या थंडीतही या कार्यक्रमांचे आकर्षण कमी होत नाही. अलीकडे ग्रामीण भागातूनही काही ठिकाणी साहित्य संमेलने भरवली जातात. साहित्य संमेलन हे अधिक व्यापक स्वरुपात असते. ते मोठमोठ्या पातळ्यांवर केले जाते. मग ग्रामीण भागातून छोटी छोटी साहित्य संमेलने खरंच हवीतच का? असाही प्रश्न विचारला जातो. वरवर पाहाता हा प्रश्न योग्यच वाटतो; पण त्याची दुसरी बाजूही तपासून पाहायला हवी.
- सौ. वृंदा कांबळी
................
मोठी संमेलने ही तशी मोठमोठ्या शहरांतून भरवली जातात. तेथे प्रत्यक्ष साहित्य या विषयाबरोबरच झगझगाट, बडेजाव, मोठेपणा, मिरवणे वगैरे अनेक कृत्रिम गोष्टीही त्या व्यापक स्वरुपाच्या अनुषंगाने येऊही शकतात. आज मोबाईलमुळे ग्रामीण भागातील नागरिकही बऱ्याच प्रमाणात वाचतो, समजतो. अनेक साहित्यप्रेमी ग्रामीण भागातही असतात. नव्हे, तेथील निसर्गाच्या सहवासात अनेक लिहिते हात निर्माण होतात; पण योग्य वातावरणाअभावी, योग्य मार्गदर्शनाअभावी व प्रोत्साहनाअभावी ते ग्रामीण भागातील साहित्यप्रेमी प्रसिद्धीपासून दूरच राहातात. ग्रामीण भागातील साहित्याचा उपासक कितीही मनात आले तरी दोन-तीन दिवसांचा वेळ, पैसा, खर्च करून, प्रवास करून साहित्य संमेलनांना उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे त्यातील अनेक गोष्टींपासून तो वंचित राहतो. म्हणूनच साहित्य संस्थांनी ग्रामीण पातळीवर जर छोटी छोटी साहित्य संमेलने भरवली, तर ग्रामीण भागातील लोकांना त्याचा लाभ मिळेल. साहित्य संमेलन म्हणजे काय असते, ते कसे असते, याविषयीची उत्सुकता पूर्ण होईल. साहित्य संमेलन छोटे असले तरी ते मोठ्या संमेलनांची छोटी प्रतिकृतीच असते. त्यात पुस्तक स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल्स, विविध गृहोद्योगातील वस्तूंचे स्टॉल्स असे संमेलनाला धरून ठेवता येतील. यामुळे संमेलनाला लोकांची उपस्थितीही चांगली राहील. ग्रामीण भागातील विक्रेत्यांना संधी मिळेल. ग्रामीण भागातील जे साहित्यापासून पूर्णपणे दूर आहेत, त्यांच्यात साहित्य याविषयी जाणीवजागृती तरी होईल. उद्बोधनात्मक कार्यक्रमांतून अनेक विषयांवरील जागृती करता येईल. ग्रामीण लोकांना व्यासपीठ मिळेल. त्यातून प्रेरणा मिळून लिहित्या हातांना शक्ती मिळेल, ते अधिक जोमाने लिहू लागतील. प्रत्येक माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही जशी गरज आहे, तशीच बौद्धिकदृष्ट्या सांस्कृतिक विषयांचीही भूक असते. ती मानवी मनाची गरज असते. साहित्य संमेलनाच्या गावातील वातावरणामुळे एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण होते. कुठेतरी बसून गप्पांमध्ये किंवा मोबाईल पाहण्यात वेळ घालवणाऱ्या लोकांनाही उत्साही सहभागाची संधी मिळते. ग्रंथदिंडीने वातावरण उत्साही बनते. चांगले कपडे करून ग्रंथदिंडीत लोक उत्साहाने व आनंदाने सहभागी होतात. संघटित युवाशक्तीची ताकद कार्यातून दिसून येते. माणूस हा उत्सवप्रिय असतो. त्यामुळे गावातील मंदिरातून भरणाऱ्या जत्रा गर्दी खेचतात. त्यात श्रद्धेचा भाग असतो; पण तरीही उत्साही वातावरणात मिसळण्याची मानवी मनाची भूकही असतेच. तसेच साहित्य संमेलन हेही सरस्वतीच्या उपासनेसाठी भरवलेली एक प्रकारची जत्राच म्हणायला हरकत नाही. म्हणूनच ग्रामीण साहित्य संमेलनांची उपयुक्तता आता वाढत आहे. साहित्य संस्थांनीही मोठी संमेलने घेण्यापेक्षा ग्रामीण साहित्य संमेलनांवर भर द्यावा. ग्रामीण साहित्य संमेलनातून वाचन संस्कृती टिकवण्यासाठीही प्रयत्न होतील. आज वाचन संस्कृती लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे. छोट्या-छोट्या संमेलनांतून ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे शक्य आहे.