रत्नागिरी ः महिलेच्या डोक्यात सळी घालून दागिन्यावर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः महिलेच्या डोक्यात सळी घालून दागिन्यावर डल्ला
रत्नागिरी ः महिलेच्या डोक्यात सळी घालून दागिन्यावर डल्ला

रत्नागिरी ः महिलेच्या डोक्यात सळी घालून दागिन्यावर डल्ला

sakal_logo
By

59564
वृद्धेच्या डोक्यात सळी घालून जबरी चोरी
पाली सरोदेवाडीत घटना; चोरट्याने पळवले साडेसहा लाख रुपयांचे दागिने
रत्नागिरी, ता. ३१ ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज सरोदेवाडी येथे वृद्धेच्या डोक्यात लोखंडी सळी मारून तिला जखमी करत साडेबारा तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पसार झाला. चोरट्याने एकूण साडेसहा लाख रुपयांचे दागिने पळविले. जखमी वृद्धेवर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार करून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, विजया विलास केतकर (वय ६५) या एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुले रत्नागिरीला असतात. त्यांच्या घरावर पाळत ठेवून चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केला. त्या वेळी केतकर स्वयंपाक खोलीत होत्या. त्यांच्या डोक्यात दोन वेळा सळीने हल्ला केला. त्यात त्या वृद्धा जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. घाबरलेल्या अवस्थेत जखमी केतकर यांनी आरडाओरडा केला. चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले तसेच कपाटातील काही दागिने गोळा करून पोबारा केला. चोरट्याने सुमारे साडेबारा तोळे दागिने चोरले. एका हातातील सोन्याच्या बांगड्या काढता आल्या नाहीत. त्यामुळे धांदलीत त्याने सोन्याच्या रिंगा व अन्य दागिने वाटेतच टाकून पलायन केले.
महिलेच्या ओरडण्यामुळे शेजारी मदतीसाठी धावले. त्या वृद्धेला पाली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यामध्ये महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
हा प्रकार समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले. या प्रकरणी पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार मोहन कांबळे, संतोष कांबळे, राकेश तटकरी व अन्य कर्मचाऱ्यां‍नी घटनास्थळी पाहणी केली. याशिवाय रत्नागिरी ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची दोन स्वतंत्र पथके स्थापन करून चोरट्याचा तपास सुरू केला आहे. या परिसरातील पहिलीच घटना असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलिसपाटील नितीन कांबळे, सरपंच गौरव संसारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.

श्वानाने महामार्गपर्यंत काढला माग
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने काल रात्रभर चोरट्याचा सर्वत्र शोध घेतला; परंतु कुठेही चोराचा माग काढता आला नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक सपोर्ट युनिट रत्नागिरीचे अक्षय कांबळे, ठसे तज्ज्ञ एपीआय अमोल कदम आले होते. त्यांनी आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. श्वानपथकाने घराजवळून महामार्गापर्यंत माग काढून तिथेच घुटमळले. यावरून चोरटा तेथून गाडीने पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.