आत्महत्येचा तपास गुन्ह्यापलीकडे जाऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्येचा तपास गुन्ह्यापलीकडे जाऊन
आत्महत्येचा तपास गुन्ह्यापलीकडे जाऊन

आत्महत्येचा तपास गुन्ह्यापलीकडे जाऊन

sakal_logo
By

आत्महत्येचा तपास गुन्ह्यापलीकडे जाऊन
पोलिस अधीक्षक कुलकर्णी ; जनजागृती मोहीम
रत्नागिरी, ता. ३१ ः जिल्ह्यात तरुणाईमध्ये वाढलेल्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन पुढाकार घेणार आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून आत्महत्येमागील कारणे शोधून काढली जातील. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन सार्वजनिक स्तरावर जनजागृती मोहीम हाती घेऊन तरुणाईच्या मनाचा वेध घेतला जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आत्महत्येचा तपास फक्त गुन्ह्यापुरता न करता त्या पलिकडे जाऊन करताना सामाजिक प्रश्न म्हणून त्याकडे पाहिले जाणार आहे.
कुलकर्णी हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी तालुक्यात आठहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणवर्गाचा सर्वात जास्त समावेश आहे. तरुणवर्ग जीवन संपवण्याचा मार्ग का अवलंबतो, याचा प्राधान्याने शोध घेणे आवश्यक आहे. सामाजिकदृष्ट्या ही बाब गंभीर आहे. ग्रामीण भागातील तरुणवर्ग आत्महत्या करण्याकडे का वळत आहे, याचा शोध तज्ज्ञांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न पोलिस दलामार्फत करण्यात येणार आहे. आत्महत्या रोखण्यावर भर दिला जाईल. प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे, याचा शोध घेणे अवघड आहे; मात्र तरुणवर्गाची मानसिकता आत्महत्येकडे का जात आहे, याचा शोध घेतानाच सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक काय प्रयत्न करता येतील याचा अभ्यास पोलिस दल करत आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे.

चौकट
आत्महत्येचा तपास गुन्ह्यापुरता नको
आतापर्यंत ज्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याच्या कारणांचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. केवळ आत्महत्येच्या गुन्ह्यापुरता तपास न करता संबंधिताची आत्महत्या करण्याची मानसिकता का झाली, याचाही शोध तपासिक अधिकाऱ्यांनी करावा अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिले आहेत.