मैल्यावर प्रक्रियेतून फुलली केळीची बाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैल्यावर प्रक्रियेतून फुलली केळीची बाग
मैल्यावर प्रक्रियेतून फुलली केळीची बाग

मैल्यावर प्रक्रियेतून फुलली केळीची बाग

sakal_logo
By

59630
कारिवडे ः येथील घनकचरा प्रकल्प परिसरात फुलविलेली केळीची बाग. बाजूलाच फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांट.

59629
कारिवडे ः केळीच्या बागेत तयार झालेली केळी दाखविताना कर्मचारी.

मैल्यावर प्रक्रियेतून फुलली केळीची बाग

सावंतवाडी पालिकेचा प्रयोग; घनकचरा व्यवस्थापनातील दमदार पाऊल

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः येथील पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सेप्टीक टँकमधून येणाऱ्या मैल्यावर फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून कारिवडे येथील घनकचरा प्रकल्प परिसरात खतनिर्मिती व जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यातून तयार होणारे खत व पाण्याच्या वापरातून केळीची बाग फुलविली आहे. गेली दीड वर्षांपासून हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.
येथील पालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त निधीतून काही प्रकल्प हाती घेतले आहेत. कारिवडे येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी शहरातील सेप्टिक टॅंकमधून प्राप्त होणारा मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प हा त्यापैकी एक आहे. विविध प्रकल्प राबवण्यावर पालिकेने नेहमीच भर दिला आहे. यापूर्वी शहरात मंदिर परिसरातून गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविला होता. आजही हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरु आहे. तयार होणाऱ्या खताची विक्रीही सुरु आहे. त्यामुळे नुसता प्रकल्प न राबविता त्यातून पालिकेला उत्पन्न मिळण्यावर पालिकेने नेहमीच भर दिला आहे. आता शहरातील सेप्टिक टॅंकमधील मैल्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. केवळ खत निर्मिती न करता आतील सांडपाण्याचे शुद्धीकरणही या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे खत आणि पाणी दोघांचा वापर केळीची बाग फुलवण्यासाठी केला जात आहे. यातून उत्पन्नही यायला सुरवात झाली असून ते पालिकेच्या तिजोरीत जमा केले जात आहे.
या प्रकल्पातून तयार झालेल्या खताचा व पाण्याचा वापर केवळ केळीच्या बागासांठी केला जात नसून शहरात प्रत्येक प्रभागात असलेल्या पालिकेच्या मालकीची अनेक उद्याने आहेत. या उद्यानातील झाडांना सुद्धा या खताचा व पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने खतावर खर्च करण्याची गरज पालिकेला भासत नाही. गेली दीड वर्षे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा प्रकल्प यशस्वीरित्या चालविला जात आहे. सद्यस्थितीत उभारण्यात आलेला हा प्रकल्प काहीसा छोटा आहे; परंतु शहरातील प्राप्त होणाऱ्या मैला लक्षात घेता मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठ्या निधीचीही गरज आहे आणि तो प्राप्त होताच भविष्यात असे मोठे प्रकल्प हाती घेण्यास पालिका प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे.
------------
चौकट
सांडपाण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज
सावंतवाडीत सद्यस्थितीत सांडपाण्याचा प्रश्न नेहमीच प्रकर्षाने पुढे आला आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही याठिकाणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. शिवाय नागरिकांची मानसिकताही तितकीच हवी. शहरात काही वर्षांपूर्वी हा प्रकल्प राबवण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले होते; परंतु यासाठी आवश्यक पाठपुरावा व उचल त्यावेळी झाली नसल्याने हा प्रकल्प होऊ शकला नाही.
-------------
कोट
सावंतवाडी पालिकेच्या आरोग्य विभागमार्फत गेले दीड वर्ष शहरातील मैलापासून खत निर्मिती आम्ही करत आहोत. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही प्राप्त होत आहे. अलिकडेच पालिकेने सेप्टीक टँक गाडी खरेदी केली. त्यामुळे भाड्यापोटीची रक्कमही वाचत आहे. भविष्यात अशाच प्रकारचे इतर तंत्रज्ञान असणारे प्रकल्प राबविण्यास पालिका प्रयत्नशील आहे.
- पांडुरंग नाटेकर, आरोग्य निरीक्षक, सावंतवाडी पालिका