कोट्यवधीच्या ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोट्यवधीच्या ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा
कोट्यवधीच्या ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा

कोट्यवधीच्या ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा

sakal_logo
By

ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा
दुर्गम भाग पक्क्या रस्त्याविना; कोट्यवधीच्या खर्चुनही अवघ्या वर्षभरात दुरवस्था
खेड, ता. १ः ग्रामीण भागाला दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे, दुरवस्था झालेल्या रस्त्याचे पुनरुज्जीवन करून सर्व खेड्यागावांना विकासगंगेशी जोडावे या उदात्त हेतूने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवर शासन कोट्यवधी रुपये खर्ची घालते; मात्र दुर्गम भाग असलेली अनेक गावे अद्यापही पक्क्या रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक गावांचा खडतर प्रवास अद्यापही कायम आहे. दापोली तालुक्यातील दाभिळ ते पन्हाळेकाजी रस्ता हे त्याचे एक उदाहरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला १ वर्षदेखील होत नाही तोच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरवस्था झाली आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दाभिळ ते पन्हाळेकाजी हा ५ किमी अंतराचा लाखो रुपये खर्चाचा रस्ता २०१९- २० मध्ये बनवण्यात आला; परंतु वर्षभरानंतर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे व जागोजागी रस्त्याला भेगा पडून डांबर खडी निघण्याचा प्रकार सुरू झाला आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिकांची धडपड चालू होती. सततचा पाठपुरावा केला जात होता.
लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. शेवटी नागरिकांच्या प्रयत्नांना यश येऊन हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झाला. त्यामुळे एक दर्जेदार रस्ता मिळेल या आशेने रस्त्यावर गेली ४ वर्षे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम चालू असताना होणारा त्रास लोकं सहन करत होते; परंतु गेल्या वर्षी मे महिना अखेरीस पावसाळा सुरू होण्याआधी अंतिम टप्प्याचे ५ कि.मी.चे काम फक्त २० दिवसात अक्षरशः गुंडाळण्यात आले. परिणामी रस्त्याला भेगा पडून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी तसेच रस्त्यावर सीलकोट परत करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.