महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे अधिकारी संगीता कुबल यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे 
अधिकारी संगीता कुबल यांचा गौरव
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे अधिकारी संगीता कुबल यांचा गौरव

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे अधिकारी संगीता कुबल यांचा गौरव

sakal_logo
By

59695
नवी मुंबई ः संगीता कुबल यांना ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र-एमजेएफ अवॉर्ड’ देऊन गौरविताना मान्यवर.

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे
अधिकारी संगीता कुबल यांचा गौरव
वेंगुर्ले ः नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे येथील पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र-एमजेएफ ॲवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. ३०) विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कुबल यांनी गेल्या कित्येक वर्षांत केलेल्या विधायक क्षेत्रातील गौरवपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी, त्याद्वारे समाजघटकांना प्रेरणा मिळावी व कुबल यांना भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ मिळावे, हा पुरस्कार देण्यामागे हेतू होता. या पुरस्काराबद्दल कुबल यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
..............
‘हयातीचे प्रमाणपत्र ३० पर्यंत द्या’
सिंधुदुर्गनगरी ः निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र संबंधित बँकेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी केले. सर्व निवृत्तवेतनधारक व कुटुंब निवृत्तवेतनधारकांच्या नावाची यादी संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. त्या यादीमधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करण्यात यावी. राज्य शासकीय निवृत्तवेतनधारक व कुटुंब निवृत्तवेतनधारक यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र निवृत्तवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये सादर करणे आवश्यक आहे. हयातीच्या दाखल्यासोबत सध्याचा भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक व आधारककार्ड क्रमांक आदी माहिती सादर करावयाची आहे. शिवाय संबंधितांनी पुन:श्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्वीकारली नाही, तसेच पुनर्विवाह केला नसल्याबाबतची माहिती संबंधित बँकांकडे सादर करणे आवश्यक आहे.
--
तांदूळ काळा पडण्याची भीती
सावंतवाडी ः मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात कापणीत अडथळा निर्माण झाला होता. मुसळधार पावसामुळे भातं आडवी झाल्यामुळे सुमारे ५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त विमा उतरवलेल्या ८३४ जणांनी परताव्यासाठी संबंधित कंपनीला सूचना दिलेल्या आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २३ ऑक्टोबरला पाऊस महाराष्ट्रातून बाहेर पडला. त्यानंतर दिवाळीच्या दिवसापासून थंडीला सुरवात झाली. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस थांबतो; मात्र यंदा परतीचा पाऊस लांबला. त्याचा फटका भातशेतीला बसला. जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. त्यातील कमी दिवसाची म्हणजेच हळवी भात बियाण्यांची कापणीला लांबलेल्या पावसाचा फटका बसला आहे. यावर्षी दसरा झाल्यानंतर भात कापणीसाठी तयार झाले होते. याच कालावधीत पावसाचा जोरही वाढलेला होता. दिवसा कडकडीत ऊन आणि सायंकाळनंतर मुसळधार पाऊस असे चित्र होते.
----
राखीव तीन डब्यांची मागणी
चिपळूण ः रत्नागिरीहून दिव्याकडे जाणाऱ्या पॅसेंजरचे पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे तीन डबे राखीव होते; मात्र कोरोना महामारीच्या काळात हे डबे रद्द करण्यात आले. ते आता पूर्वीप्रमाणे सुरू केल्यास तोट्यात जाणाऱ्या कोकण रेल्वेला दिलासा मिळेल. कोकण रेल्वे रो-रो सेवेवर अधिक लक्ष्य केंद्रित करत आहे. त्यांनी प्रवासी वाहतुकीवर अधिक लक्ष दिल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होईल; परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोकण रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती दादर पॅसेंजर चालू करण्याबाबत मागणी करत आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी ती डबे राखीव होते. गाडी सुटताना पूर्वी हे डबे आतून कडी लावून बंद करण्यात येत होते. स्टेशन आल्यावर ते उघडले जात होते. कोरोनाच्या काळात ते डबे प्रवासी कमी असल्याने बंद केले होते; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे दिवा पॅसेंजरचे हे तीन डबे पूर्वीप्रमाणे संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव ठेवावेत म्हणजे प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेला अधिकचा फायदा होईल.
---
रंगभूमी दिनी विशेष कार्यक्रम
रत्नागिरी ः मराठी रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश पायऱ्यांवर प्रतिवर्षाप्रमाणे कार्यक्रम साजरा होणार आहे. या वर्षीपासून ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेची सभा राज्याचे उद्योगमंत्री तथा नाट्य परिषद शाखाध्यक्ष उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. संगीत रंगभूमीवर काम केलेले ज्येष्ठ रंगकर्मी परशुराम केळकर (सध्या कुवारबाव, मूळ मालगुंड) यांचा सन्मान नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे. या विशेष औचित्याने काही सादरीकरणे येथे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रवेश, रेकॉर्ड डान्स, नाट्यप्रवेश आदी प्रकारांतील मर्यादित सादरीकरण येथे होणार आहे. इच्छुकांनी वामन कदम, अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन नाट्य परिषदेच्यावतीने कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.
--------
पोस्टाद्वारे शुभेच्छापत्र पाठविणाऱ्यांत घट
सावंतवाडी : ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात अप्ल प्रमाणात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.
-------
भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृती सप्ताह
रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्ट्राचार निर्मुलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मुलन बैठका घेण्यात येणार आहेत. कोणीही शासकिय, निमशासकिय अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुशांत चव्हाण, टोल फ्री नंबर- १०६४ यावर करण्याचे आवाहन या विभागाकडून केले आहे.