Kokan जाधवांच्या बंगल्यावरील हल्ल्याची लवकर उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
चिपळूण ः

Kokan : जाधवांच्या बंगल्यावरील हल्ल्याची लवकर उकल

चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांच्या सुवर्णभास्कर या बंगल्यावर हल्ल्याच्या प्रयत्न प्रकरणात पोलिस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तपासासाठी तब्बल ७ पथके पोलिसांनी तैनात केली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तसेच सीडीआर पोलिसांनी जमा केले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण पाग येथील सुवर्णभास्कर या बंगल्यावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या परिसरात दगड, स्टंप आणि पेट्रोलच्या बॉटल्स आढळून आल्याने हा थेट हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा हल्ला भाजप कार्यकर्ते राणे समर्थकांनी केला असल्याचा थेट आरोप करत काही संशयितांची नावेदेखील पोलिसांना दिली होती.

आमदार जाधव यांचे पुत्र समीर जाधव यांनी या प्रकरणी रितसर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी तपासाला वेग दिला असून वेगाने सूत्रे हलवण्यास सुरवात केली आहे. ठसेतज्ञांनी ठसे घेऊन परीक्षणासाठी पाठवले आहेत तर श्वानाने सुवर्णभास्कर परिसरात किमान २ कि.मी. अंतर ढवळून काढल्याचे दिसून आले आहे.

तपास वेगाने व्हावा म्हणून आता पोलिसांची तब्बल ७ पथके तैनात करण्यात आली . प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे. तसेच सुवर्णभास्कर बंगला परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज व सीडीआर तपासून ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार ज्या संशयितांची नावे देण्यात आली आहेत अशा ८ संशयितांनादेखील पोलिसांनी पाचारण केल्याची माहिती पुढे आली आहे; मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती पोलिस देण्यास तयार नाहीत. परंतु पोलिसांनी सुरू केलेली वेगवान हालचाल पाहता या प्रकरणाची उकल लवकरच होण्याची श्यक्यता दिसून येत आहे.

दरम्यान, आमदार जाधव यांच्या घराजवळ तसेच कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.दिवाळी सणआत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काटेकोरपणे यंत्रणा हाताळल्याने शांतता नांदली.याबाबत जनतेने समाधान व्यक्त केले.