नव्यावर्षात दाखले, उतारेंचे शुल्क दुप्पट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्यावर्षात दाखले, उतारेंचे शुल्क दुप्पट
नव्यावर्षात दाखले, उतारेंचे शुल्क दुप्पट

नव्यावर्षात दाखले, उतारेंचे शुल्क दुप्पट

sakal_logo
By

नव्यावर्षात दाखले, उतारेंचे शुल्क दुप्पट
रत्नागिरी पालिका प्रशासनाचा निर्णय; राजकीय पक्ष मूग गिळून
रत्नागिरी, ता. १ः नागरिकांना आवश्यक दाखले, उतारेच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून घेतला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. वाढीव दरासंदर्भातील जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी हरकत न घेतल्यास १ जानेवारी २०२३ पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे.
विभागीय कोकण आयुक्तांच्या ८ जूनच्या सूचनेनुसार पालिकेचे उत्पन्नवाढीसाठी उतारे, दाखल्यांच्या शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. तशी सूचना रत्नागिरी पालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यात पालिकेने नवा ठराव केला आहे. त्या ठरावानुसार असेसमेंट उतारा २०० रुपये, असेसमेंट नाव दाखल व दुरुस्त करणे ७५० रुपये, व्यावसायिकांसाठी २ हजार रुपये, वसुली विभागाकडून देण्यात येणारे सर्व दाखले २०० रुपये, भूखंड नसल्याबाबतचे उतारे २०० रुपये, सर्व्हेक्षण उतारा २० रुपये प्रत असे दर आकारण्यात येणार आहेत.
नव्या दरवाढीवरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेवर प्रशासक आहेत. त्यांनाच दरवाढ करण्याचे अधिकार आहेत. नागरिकांची बाजू मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पेच निर्माण होणार आहे. या दरवाढीला विरोध करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती मागवल्या आहेत. हरकती न आल्यास १ जानेवारीपासून नव्या शुल्काची अंमलबजावणी सुरू होणार आहे. नव्या दरवाढीची सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही एकाही राजकीय पक्षाने याला विरोध केलेला नाही. आतापर्यंत नागरिकांची हरकत न आल्यामुळे भविष्यात नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. या दरवाढीला विरोध करायचा झाल्यास नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागण्याची शक्यता आहे.

कोट
दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चाट पडणार असून हे दर परवडणारे नाहीत. पालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची बनत असल्यामुळे त्याचा भुर्दंड नागरिकांवर पडत आहे. हे पूर्णतः चुकीचे असून सर्व नागरिकांनी हरकती घेतल्या पाहिजेत.
- मिलिंद कीर, माजी नगरसेवक

कोट
पालिकेचे कामकाज प्रशासकांकडे दिलेले आहेत. पालिकेने उत्पन्नवाढीसाठी नागरिकांच्या खिशातून पैसे न काढता पालिकेच्या पडीक मालमत्ता उत्पन्नाचा पर्याय म्हणून वापर करावा जेणेकरून दाखल्यांच्या दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसणार नाही.
- सुदेश मयेकर, माजी नगरसेवक