संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

ओटवणे देवस्थानचा
सातपासून वार्षिकोत्सव
ओटवणे, ता. २ ः ओटवणे येथील श्री सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या वार्षिक उत्सवास सोमवारपासून (ता. ७) प्रारंभ होत आहे. सहा दिवसांच्या या उत्सवाची सांगता १२ ला होणार आहे. या वार्षिकोत्सवात दोन जत्रोत्सवांसह हरिनाम सप्ताह आणि समराधना कार्यक्रम होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस होणारा उत्सव ओटवणेचे ग्रामदैवत रवळनाथाचा वार्षिकोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. यानिमित्त रात्री कार्तिकोत्सव अर्थात जागर उत्सवाची सांगता, सवाद्य पालखी मिरवणूक, रात्री उशिरा स्थानिक कलाकारांचे नाटक होणार आहे. ८ ला सात प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी, ९ ला दुपारी हरिनाम सप्ताह सांगता, १० ला सरकारी समराधना, ११ ला गुरांची समराधना होणार आहे. १२ ला ‘पंचमीची जत्रा’निमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूक, आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, सचिव रमेश गावकर तसेच मानकऱ्‍यांनी केले आहे.

रक्तदात्या तरुणांची
अशीही कार्यतत्परता
ओटवणे ः गोवा-मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सावंतवाडी येथील गोविंद केसरकर यांना ‘एबी पॉझिटिव्ह’ या रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचे लक्ष वेधताच त्यांनी पर्वरी येथे कामानिमित्त असलेले अमोल प्रभुखानोलकर व कळंगुट येथे असलेले वैभव पेडणेकर यांच्याशी त्वरित संपर्क साधला. त्यानंतर या दोन्ही रक्तदात्यांनी तत्काळ मणिपाल रुग्णालयाच्या रक्तपेढीत जात रक्तदान केले. यासाठी महेंद्र अ‍ॅकॅडमीचे महेंद्र पेडणेकर यांचेही सहकार्य लाभले. या दोन्ही युवा रक्तदात्यांसह महेंद्र पेडणेकर, तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचे केसरकर कुटुंबीयांनी आभार मानले.


कुडाळमध्ये उद्या आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः नागेश नेमळेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ४) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत महालक्ष्मी मंदिर, लक्ष्मीवाडी कुडाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदाब, रक्तातील साखर, सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट, थायरॉईड टेस्ट, महिलांसाठी विशेष तपासणी, फिजिओथेरपी व कर्करुग्ण तपासणी या सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. तसेच योगाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ३० वर्षांवरील व्यक्तींनी मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी येताना आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन यावे. अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.