फराळासह साहित्य विक्रीतून 25 लाखांची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फराळासह साहित्य विक्रीतून 25 लाखांची उलाढाल
फराळासह साहित्य विक्रीतून 25 लाखांची उलाढाल

फराळासह साहित्य विक्रीतून 25 लाखांची उलाढाल

sakal_logo
By

rat२p१.jpg
५९८७२
रत्नागिरीः जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बचतगटांच्या दिवाळी साहित्य स्टॉलची पाहणी करताना जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, एन. बी. घाणेकर आदी.
------
महिला बचत गटांना दिवाळी पावली
फराळासह साहित्य विक्री; २५ लाखांची उलाढाल, शासकीय कार्यालयातही स्टॉल
रत्नागिरी, ता. २ः फराळासह आकाशकंदील, मातीच्या पणत्या, दिवाळी साहित्य विक्रीतून महिला बचतगटांनी दिवाळी सणात सुमारे २५ लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील ठिकाणांसह मुंबई व पुण्यामध्येही बचतगटांचा फराळ पोचला आहे. कोरोनानंतर बचतगटांच्या अर्थकारणाला दिशा मिळत असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) गटांनी भरारी घेतली आहे.
आर्थिक सबलीकरणासाठी शासनस्तरावर महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी गावागावांमध्ये महिला बचतगटांची स्थापना केली आहे. जिल्ह्यात सुमारे १४ हजार बचत गट आहेत. कोरोनापश्‍चात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी झाली. बालदोस्तांपासून प्रौढांपर्यंत सर्वजणांनी या सणाचा आनंद घेतला. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानासह चकल्या, करंजी, लाडू, चिवडा यांसह विविध प्रकारच्या फराळाचा आस्वाद घेतला जातो. घरामध्ये बनवलेल्या या फराळाची चव न्यारीच असते. ग्रामीण भागामध्ये महिला बचतगटांकडून आलेल्या फराळाला मोठी मागणी होती. या सणाचा व्यावसायिक फायदा मिळवण्यात उमेदच्या महिला बचतगटांना यश आले आहे. उमेदमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासकीय कार्यालये, गावागावातील मुख्य बाजारपेठांमध्ये बचतगटांचे स्टॉल उभारले होते. शंभरहून अधिक ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली. याचबरोबर मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागातून बचतगटातील महिलांच्या वैयक्तिक संपर्कामधूनही फराळाची मागणी आली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत मागणीनुसार फराळ पोचता करण्यात आला.
दिवाळी फराळाबरोबरच आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, प्रकाशव्यवस्थेचे साहित्य, सुशोभिकरणासाठी आवश्यक कागदी पताके तयार करून त्याची अनेकांनी विक्री केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे दिवाळीचा आनंद घेता आलेला नव्हता; मात्र यावर्षी निर्बंधमुक्त दिवाळी लोकांनी साजरी केली. दिवाळीनिमित्त गावाकडे आलेल्या चाकरमान्यांनीही बचतगटांच्या फराळाची चव चाखली. दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये १७ लाखाची उलाढाल झाली होती. यावर्षी नियोजनबद्ध कामामुळे ८ लाखाची भर पडली असून सुमारे २५ लाखाची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, दिवाळीत बचतगटांना विक्रीसाठी पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्यासह उमेदच्या प्रकल्प संचालक एन. बी. घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांनी दिवाळीपूर्वीच नियोजन केले होते. त्याची अंमलबजावणी तालुकास्तरावरही प्रत्यक्षात केल्यामुळे महिलांना बाजारपेठ मिळाली.

कोट
उमेदच्या स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न यंदा केले होते. योग्य नियोजन केल्यामुळे विक्रीही चांगली झाली. उमेदने महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली.
- प्रणिता बारगुडे, कुलस्वामिनी बचतगट

कोट
ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी ठिकाणे निवडून स्टॉलला जागा दिली होती. त्याचा फायदा बचतगटांनाही झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकचा फराळ विक्रीला गेला आहे.
- अमोल काटकर, उमेद