भातशेतीचे नुकसान; विमा भरपाईचे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातशेतीचे नुकसान;
विमा भरपाईचे काय?
भातशेतीचे नुकसान; विमा भरपाईचे काय?

भातशेतीचे नुकसान; विमा भरपाईचे काय?

sakal_logo
By

59907
वेंगुर्ले ः परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे झालेले नुकसान.

भातशेतीचे नुकसान;
विमा भरपाईचे काय?

वेंगुर्लेतील शेतकऱ्यांचा प्रश्न; तक्रार करुनही पंचनामा न झाल्याने चिंता

दीपेश परब ः सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री सफल बिमा योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात शेतीचा विमा उतरून त्याची रक्कम भरल्याने याची थोडीफार भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; मात्र संबंधित विमा कंपनीच्या धोरणांमुळे या भरपाईत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यातून भरपाई मिळणार की नाही? असा संभ्रम तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसमोर आहे.
जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून सतत ८ दिवस पडलेल्या परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच ठिकाणी भात शेतीत पाणी साचून कापणीला आलेल्या भाताच्या लोंब्या शेतात पडल्याने त्याला कोंब येऊन शेतीचे नुकसान झाले. आंबा, काजूच्या नुकसानामुळे अगोदर मेटाकुटीला आलेले शेतकरी या नुकसानाने हतबल झाले आहेत. यातच भात शेतीच्या काढलेल्या विम्यामार्फत काही प्रमाणात भरपाई मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या धोरणांचा फटका बसत आहे. कंपनीकडे क्लेम करून सुद्धा भरपाई मिळणार की नाही? या संभ्रमात सध्या शेतकरी आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सफल बिमा योजने अंतर्गत जुलै २०२२ मध्ये प्रशासनाने निश्चित केलेल्या कंपनीच्या नियमांनुसार आपल्या भातशेतीचे विमे उतरवले होते. यात हेक्टरी १०३५ रुपये रक्कम शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे जमा केली होती. यानंतर १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीला मोठा फटका बसला. कंपनीच्या नियमानुसार शेतकऱ्यांमार्फत विमा भरल्याच्या पावतीवरील टोल फ्री क्रमांकावर फोन करून विमा क्लेम करण्यात आला. यानुसार कंपनीकडून कंप्लेन्ट आयडीही दिला. यावेळी ‘‘आमचा प्रतिनिधी येऊन भात शेतीचा पंचनामा करेल व नंतर पुढील कार्यवाही केली जाईल,’’ असे कंपनीच्या टोल फ्री नंबरवरून सांगण्यात आले. यानुसार ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला फोन केले, त्यांचे पंचनामे करण्यात आले; मात्र काही शेतकरी अजूनही यापासून वंचित आहेत. तालुक्यात कंपनीचा एक प्रतिनिधी असल्याने त्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. फोन केल्यानंतर ६ ते ८ दिवसात विमा कंपनीचा प्रतिनिधी येऊन पंचनामा करेल, असे अपेक्षित होते; मात्र कंपनीने तक्रारी घेऊन सुद्धा २० ते १५ दिवस होऊन पंचनाम्यासाठी न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पंचनाम्याच्या प्रतीक्षेत भात तसेच शेतात पडून राहिल्यास काही थोड्याफार प्रमाणात भात मिळणार होते त्याचे सुद्धा नुकसान होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. यामुळे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी विभाग यांनी यात वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी विमा कंपनीशी संपर्काचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
------------
चौकट
जीव टांगणीला
वेंगुर्ले तालुक्यात तुळस, मातोंड, पेंडूर, होडावडा, वजराठ, आडेली, वेतोरे, पाल, आसोली, अणसुर या भागात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. या गावातील सातबारानिहाय सुमारे १ हजार ४९५ शेतकऱ्यांनी कंपनीकडे विमा रक्कम भरली आहे. यातील बरेचशे शेतकरी अजूनही पंचनाम्यापासून वंचित आहेत. तालुक्यात ही संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे.
-----------
कोट
माझ्याजवळ मातोंड व पेंडूर गावातील सुमारे ३५० शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भातपीक विमा उतरला होता. पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करूनही पंचनामा करायला विमा कंपनी प्रतिनिधी आला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
- प्रशांत परब, शेतकरी तथा चालक, ई-सेवा केंद्र
--------------
कोट
अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन भाताला कोंब आले आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधीची पंचनाम्यासाठी वाट पाहूनही ते आले नाहीत. गवत किंवा काही थोड्या प्रमाणात भात मिळेल या आशेने आम्ही कापणी सुरू केली आहे. शासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन न्याय द्यावा.
- नंदकिशोर घाडी, शेतकरी, मातोंड
--
कोट
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम विमा कंपनीकडून सुरू आहे. जरी भातकापणी झाली असेल तरी कंपनी प्रतिनिधी शेतकऱ्यांशी समन्वय साधून ते पंचनामे पूर्ण करत आहेत. नुकसानीबाबतची योग्य ती कार्यवाही कृषी विभाग व विमा कंपनीमार्फत करण्यात येईल.
- हर्षा गुंड, तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ले