रत्नागिरीतील पार्किंगच्या जागा खुल्या करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीतील पार्किंगच्या जागा खुल्या करणार
रत्नागिरीतील पार्किंगच्या जागा खुल्या करणार

रत्नागिरीतील पार्किंगच्या जागा खुल्या करणार

sakal_logo
By

(पान ३ साठी)

रत्नागिरीतील पार्किंगच्या जागा खुल्या करणार

पोलिस अधीक्षक कुलकर्णी ; सुरक्षित वाहतुकीसाठी आराखडा तयार करा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः वाढत्या शहरीकरणामुळे रत्नागिरी शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी सुसज्ज आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत. शहरातील पार्किंगच्या जागा खुल्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरानजीकच्या बहुतांश गावातून ग्रामस्थ आपली वाहने घेऊन शहरात येतात. त्यामुळे दिवसा वाहनांची संख्या दुप्पट होते. रत्नागिरी शहरातील रस्ता प्रशस्त असला तरी मुख्य मार्ग एकच असल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळते. वाहतूक कोंडीतून रत्नागिरीकरांची सुटका करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व मार्गांवर रस्त्यावर पट्टे मारण्याची सूचना पालिकेला करण्यात आली आहे तर मारुती मंदिर, जेलरोड, रामनाका, गोखलेनाका, लक्ष्मीचौक येथील सिग्नल तत्काळ सुरू करण्याच्या सूचना पालिकेला देणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात ज्या पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण आहे त्या जागा तत्काळ मोकळ्या करून तेथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पार्किंगसाठी जागा दिल्यानंतर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मार्गावर चारचाकी वाहने पार्किंग होत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. मुख्य मार्गावर वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता वाहतूक पोलिसांनी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार आहे.