रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात संतांची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात संतांची मांदियाळी
रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात संतांची मांदियाळी

रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात संतांची मांदियाळी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat३p८.jpg-KOP२२L६००३५
रत्नागिरी ः श्री विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्ती.
-rat३p९.jpg ःKOP२२L६००४०
जुन्या रत्नागिरीच्या मध्यवर्ती असणारे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर.
-rat३p१०.jpg ःKOP२२L६००३८
संत कबीराचे प्रतीक म्हणून छोटी घुमटी धर्मशाळेत आहे. तेथे शिवपिंडीही आहे.
-rat३p११.jpg ः KOP२२L६००३९ तत्कालीन सामाजिक स्थितीत मंदिरात प्रवेश करण्यास ज्या लोकांना मनाई होती ते लोक या शिळेला नमस्कार करत. प्रवेशद्वारापाशीच असलेल्या या जागेवरून विठ्ठलाचे दर्शन घेत.
------------


प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात संतांची मांदियाळी
समाज चळवळीचेही केंद्र ; रत्नागिरीच्या सामाजिक जडणघडणीत वाटा
मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या येथील श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात संतश्रेष्ठ पुंडलिकाच्या देवालयासह अन्य मंदिरे आणि संतांची मांदियाळी पाहायला मिळते. भर बाजारपेठेत मध्यवर्ती असणाऱ्या या मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सर्व पूजा उपचार केले जातात. सर्व संतमंडळींच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रत्नागिरीच्या सामाजिक जडणघडणीमध्ये या मंदिराचा मोलाचा वाटा आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक भाषणे झाली. स्वातंत्र्यलढाही या मंदिराने पाहिला आहे. हे नुसते धार्मिक स्थळ नव्हे तर रत्नागिरीतील जुन्या राजकीय उलाढालींचे स्वा. सावरकरांच्या वेळच्या सनातनी व प्रगत समाजातील धुमश्चक्रीचे एक जुने केंद्र मानले जाते.
जुन्या रत्नागिरीतील हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे. वीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना या मंदिरात ते अनेकदा येत असत. जनसामान्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी लढा दिला. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभा मंडपापर्यंत प्रवेश मिळाला. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी पतितपावन मंदिराची उभारणी करण्यात आली.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मुलगा सेखोजी आंग्रे यांनी आपले आरमार रत्नदुर्ग किल्ल्यावर आणले व व्यापारासाठी ५ गुजर कुटुंबे आणली. या गुजर कुटुंबीयांनीच १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात हे मंदिर बांधले. गुजर मुळचे राजस्थानातील अबूचा पहाड येथील व शैवपंथीय. मंदिराच्या भोवताली सर्व ब्राह्मण वस्ती असल्याने त्यांच्या इच्छेबरहुकूम विठ्ठलाचे वैष्णवपंथीय मंदिर बांधले असावे असा संदर्भ श्री देव भैरीच्या पालखी या अंकामध्ये देण्यात आला आहे. कोकणात आषाढ महिन्यात शेतीची कामे जोमाने सुरू असतात. भरपूर पाऊस असतो त्यामुळे पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने विठ्ठल मंदिर बांधले. त्यामुळेच पंढरपूरच्या मंदिरात होणारी काकडा आरती, महाप्रसाद, प्रवचन, कीर्तने, शेजारती असे सर्व उपचार या मंदिरात होतात. आषाढी व कार्तिकी एकादशीप्रमाणे संपूर्ण चातुर्मासात कार्यक्रम असतात. वर्षभर काकडा आरती चालू असते. या विठ्ठल मंदिराला ब्रिटिश सरकारकडून १८७४ पासून १२ रुपयांची सनद सुरू झाली.
------
चौकट
आज कार्तिकी एकादशीची यात्रा
दरम्यान, शुक्रवारी (ता. ४) मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रा भरणा आहे. परटवणे येथील भार्गवराम मंदिरापासून दाजिबा नाचणकर संस्थापित पायी वारकरी दिंडी सकाळी ११ वा. पोहोचेल. श्री विठ्ठल मंदिर संस्था व विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकादशी उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे.
-----------
चौकट १
स्वतंत्र देवालये
श्री विठ्ठल मंदिर संस्था ही संस्था १३ नोव्हेंबर १९५२ मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. येथे संतश्रेष्ठ पुंडलिकाचे स्वतंत्र देवालय आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नरहरी सोनार, संत रोहिदास, गाडगेबाबा, संत नामदेव, संत शिरोमणी गोरोबा कुंभार, संत सेना महाराज यांच्या स्वतंत्र मूर्ती विराजमान आहेत. सिद्धिविनायक गणपती, सूर्यनारायण, दत्त, गरुडेश्वर, हनुमान, सर्वेश्वराची पिंडी, देवी लक्ष्मी, साईबाबा, स्वामी समर्थ यांची मंदिरे आहेत. हे मंदिर विष्णू पंचायतन आहे.
-----------
चौकट २
शिळा जतन
चातुर्वण्य व्यवस्था असताना हे मंदिर उभारण्यात आले. त्या वेळी समाजातील काही मंडळींना मंदिर प्रवेश नव्हता; परंतु तेही विठोबा हा आपला देव मानत. स्वच्छता करणारी ही मंडळी आपली झाडू मंदिराच्या बाहेर ठेवून कमानीच्या आत आल्यावर ठेवलेल्या शिळेसमोर उभे राहून विठोबाला नतमस्तक व्हायचे. हे स्थानही संत चोखामेळा यांचे म्हणून त्याचे जतन करून ठेवले आहे. तसेच धर्मशाळेमध्ये संत कबीराची स्वतंत्र घुमटी आहे.