रत्नागिरी- क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- क्राईम
रत्नागिरी- क्राईम

रत्नागिरी- क्राईम

sakal_logo
By

खासगी-एसटी बसमध्ये
धडकेत दोघे जण जखमी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे खासगी आणि एसटी बसमध्ये अपघात झाला. यामध्ये एसटी चालक जखमी झाला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित खासगी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सकाळी सहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक साठवाराव गणेशराव येळणे (वय ४०, रा गोळ्गवा, ता. औढा-नागनाथ, जि. हिंगोली. सध्या कारवांचीवाडी येथे भाड्याने-रत्नागिरी) हे एसटी (एमएच २० बीएल ४०२८) घेऊन चिपळूण ते रत्नागिरी असे येत होते. मुंबई ते गोवा महामार्गावर निवळी घाट येथे आले असता समोरून येणारी खासगी बस (जीए -०२ एमआर ३१८) वरील चालक याने पुढील ट्रकला बाजू देऊन जात असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेला भरधाव आणून समोरून एसटी बसला ठोकर दिली. या अपघातात एसटी चालक साठवाराव येळणे यांच्या छातीला किरकोळ दुखापत तर वाहक अनिल खांडेकर यांना मुकामार बसला. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी साठवाराव येळणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी खासगी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.

मिरजोळेत दारू अड्ड्यावर छापा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या पाटीलवाडी-मिरजोळे येथे विनापरवाना हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये १३ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश अनंत सावंत (वय ४२, रा. वाघजाईवाडी, शिळ, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गावठी दारूची भट्टी तयार करून गावठी हातभट्टीचे साहित्य व गावठी दारू तयार करत असताना सापडला. त्यांच्याकडून १२ हजार ५०० रुपयांचे नवसागरमिश्रित रसायन व ३५० रुपयांचे इतर साहित्य व ५०० रुपयांची नऊ लिटर दारू असा सुमारे १३ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सापडला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार भगवान पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

लोखंडी कप्पी मानेवर पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात मच्छीमार बोटीवर मासेमारी करत असताना बोटीतील लोखंडी कप्पी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू झाला. अब्दुलगनी पुसाफ पोसगे (वय ४४, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुलगनी हे मच्छीमार बोटीवर कॅप्टनचे काम करत होते. गुरुवारी पहाटे ते बोट मासेमारीसाठी समुद्रात घेऊन गेले. त्या वेळी बोटीवरील कप्पी त्यांच्या मानेवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

महिलेशी गैरवर्तन, संशयितावर गुन्हा
दाभोळ ः सालदुरे येथे महिलेला अश्‍‍लील शिवीगाळ करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन होईल असे वर्तन करणाऱ्या पुणे येथील एका पर्यटकावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला सायंकाळी पावणे आठच्या सुमारास काही पर्यटक सालदुरे येथील एका होम स्टेमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण करत असताना लाईटभोवती फिरणारे कीटक जेवणात पडल्याने पर्यटक राजेश मोरे याने तेथे असलेल्या एका महिलेला अश्‍‍लील भाषेत शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या महिलेने दापोली पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दिल्यावर संशयित राजेश पुंडलिक मोरे (रा. पुणे) याच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.

विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दाभोळ ः दापोली तालुक्यातील कोंढे-शिगवणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शांताराम शिगवण (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना ३१ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम शिगवण यांनी संध्याकाळी कोंढे-शिगवणवाडी येथील बामणशेत या शेतातील सार्वजनिक विहिरीजवळ येऊन आपला टी-शर्ट काढून ते विहिरीच्या कठड्यावर ठेवून त्यांनी विहिरीत उडी मारली व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा सुभाष शिगवण याने दापोली पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

चाकाळे कोळकेवाडीतून मुलगा बेपत्ता
खेड ः तालुक्यातील चाकाळे-कोळकेवाडी येथील प्रेम मुसाफिर यादव (वय १४ ) हा मुलगा ३० ऑक्टोबरला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मौजे चाकाळे कोळकेवाडी येथून रागाच्या भरात निघून गेला आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.